
दैनिक स्थैर्य । 6 मे 2025। फलटण । प्रगत शिक्षण संस्थेच्या कमला निंबकर बालभवन व आपली शाळा येथील विद्यार्थ्यांच्या निवडक लेखनातून दरवर्षी ‘नवनीत’ नावाची वार्षिक पत्रिका प्रकाशित केली जाते. यावर्षी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते ‘नवनीत’ नावाची वार्षिक पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या विश्वस्त तथा उपाध्यक्ष डॉ. मंजिरी निंबकर यांनी सांगितले की, ‘नवनीत’ च्या मलपृष्ठावर सुनिता विल्यम्स यानातून स्पेस स्टेशन मध्ये गेल्या. यानाच्या झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे बराच काळ त्या तिथेच अडकून पडल्या. त्या जेव्हा पृथ्वीवर आल्या त्याचा व्हिडिओ या बालवाडीतील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला होता. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे बालवाडीच्या मोठ्या गटातील अभिज्ञा सावंत या मुलीने चित्र काढले. या चित्राविषयीची माहिती तिच्याकडून ऐकल्यानंतर व्हाऊ, फनस्टॅस्टिक, किती अद्भुत आहे हे! विश्वासच बसत नाही! किती बारकावे तिने या चित्रात टिपलेले आहेत, असे उद्गार विवेक सावंत यांनी काढले.
निवडक लेखनातून साहित्याच्या सर्वच प्रकारांमध्ये विद्यार्थी लेखन करतात. कथा, कविता, प्रवासवर्णन, आपल्या जीवनातील अविस्मरणीय क्षण! आणि बरच काही. मुलांच्या अभिव्यक्तीला जागा देणारे हे नवनीत मुलांच्या कल्पकतेतून व अथक परिश्रमातून तयार होते. मुखपृष्ठ, मलपृष्ठ अगदी संपादकीय ही विद्यार्थी व शिक्षक मिळून लिहितात. त्यामुळे ते एक वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचते. यात विद्यार्थ्यांचे लेखन मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा छापले जाते. यातील प्रत्येक लेख,कविता विद्यार्थ्यांची कल्पकता, सृजनशीलता आणि संवेदनशीलतेला गवसणी घालणारे असतात. यातील लेखन निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाचा विचार रुजवणारे असते.
यावर्षीच्या नवनीतच्या मुखपृष्ठावर आयुक्त कांगुणे या इयत्ता आठवीतील विद्यार्थिनीने शाळेत कासव मित्र मोहन उपाध्ये यांच्याशी ऑनलाईन झालेल्या गप्पा यातून सागरी कासव संवर्धनामध्ये त्यांनी केलेले काम याविषयी विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. मुलांनी कासव थीम वापरून बनवलेल्या काही भेटवस्तू मोहन दादांना पाठवायच्या असं ठरवून अमूर्त आकार घेऊन त्यातून वेगवेगळ्या रेषा, पोत आणि पॅटर्न चा वापर करून काढलेल्या कासवाचे चित्र हे यावर्षीचा मुखपृष्ठ ठरलं. मुखपृष्ठ मांडणी आणि अंक मांडणी रमाकांत धनोरकर यांनी केली आहे.
यावेळी संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी सोमीनाथ घोरपडे उपस्थित होते. नवनीत अंक संस्थेच्या फेसबुक पेजवर जाऊन पाहण्याचे आवाहन शाळेच्यावतीने करण्यात आले.