स्थैर्य,ओगलेवाडी, दि २६ : जगप्रसिद्ध ओगले काच कारखान्याची स्थापना 25 नोव्हेंबर 1916 रोजी झाली. त्याला काल 104 वर्षे पूर्ण होत आहेत. कारखान्याच्या काळातील कामगार व लोकांच्या जुन्या आठवणी आजही ताज्या आहेत. हा कारखाना बंद पडल्यानंतर लोकांची या भागात नवीन मोठा उद्योग उभारण्याची मागणी कायम आहे.
सन 1980 मध्ये कारखाना बंद पडला. त्यामुळे परिसरातील औद्योगिक क्षेत्राची मोठी घसरण झाली. शेकडो कामगार बेकार झाले. भागातील 15 खेड्यांतील कामगारांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यानंतर तरुणांच्या हातांना रोजगार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने परिसरात मोठा उद्योग उभारण्याची मागणी जोर धरत आहे. जवळच राष्ट्रीय महामार्ग, मुबलक जागा, पाणी, वीज आणि मजुरांची अनुकूलता आहे. रेल्वे स्थानक, विमानतळ आदी दळणवळणाची साधने उपलब्ध आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांचे जाळेही आहे. त्यामुळे नवीन उद्योगधंद्याची उभारणीस व वाढीस अनुकूलता आहे. ओगले यांच्या प्रभाकर कंदीलामुळे कऱ्हाड तालुका देशाच्या औद्योगिक नकाशावर आला.
पाकिस्तानातून आलेल्या बोटीत सापडले 100 किलो हेरोइन आणि 5 पिस्तुल
कारखान्याचे संस्थापक आत्मारामपंत ओगले यांनी 25 नोव्हेंबर 1916 रोजी येथे लहानशा झोपडीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतः पहिली काच तयार केली. ती औंधच्या संग्रहालयात आजही पाहावयास मिळते. दुसऱ्या महायुद्ध काळात टाटांना काच बाटल्यांचा पुरवठा या कारखान्यातून होत होता. कंदिलाचे सारे उत्पादन सरकारने घेतले होते. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व लोकमान्य टिळकांनी या कारखान्यास भेट दिली. 1962 मधील भारत-चीन युद्धात ओगल्यांच्या प्रभाकर कंदिलाने हिमालयाच्या कुशीत लढणाऱ्या भारतीय जवानांना मोलाची साथ करून ऐतिहासिक व अभिमानास्पद कामगिरी केली आहे.