स्थैर्य, फलटण, दि.२१: कोराना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी विविध उपाय योजना राबवितानाच दाखल रुग्णांना वैद्यकिय सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न सर्वस्तरावर सुरु असताना रक्ताची टंचाई सर्वांनाच जाणवल्याच्या पार्श्वभूमीवर वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन फलटण शाखेच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करुन केलेल्या आवाहनानुसार शहर व परिसरातील 353 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती ऑर्गनायझेशनच्यावतीने देण्यात आले आहे.
सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे आयोजित या रक्तदान शिबीराचे उद्घाटन छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस जलाभिषेक करुन पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन संपूर्ण राज्यात कोविड योध्दा म्हणून कार्यरत असून त्याभागातील गरजेनुसार ऑर्गनायझेशनच्या माध्यमातुन रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर व ऑक्सीजन सुविधेसह बेड, इंजेक्शन्स व अन्य औषधे तसेच वैद्यकिय अधिकारी, कर्मचार्यांसाठी विविध साधने उपलब्ध करुन देण्यात आल्याचे नमुद करीत फलटण, सातारा, कराड, सांगली या भागात रक्तपेढ्यामध्ये रक्तसाठा कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यास फलटणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले.
शासनाचे नियम, निकष सांभाळून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबीराचे यशस्वीतेसाठी दत्ता जगदाळे सर, गजानन चव्हाण, सुरज नलवडे, सागर धुमाळ, सुनिल यादव, आशिष तावरे, ऋषीकेश कदम व त्यांच्या सहकार्यांनी मोठी मेहनत घेतली.