रस्ते अपघातात बळी पडलेल्यांसाठी जागतिक स्मरण दिवस साजरा


दैनिक स्थैर्य । दि. २२ नोव्हेंबर २०२२ । सातारा । रस्ता सुरक्षा समिती, सातारा तर्फे रविवार दि. 20 नोव्हेंबर 2022 हा दिवस रस्ते अपघातात बळी पडलेल्या निष्पाप व्यक्तींचा स्मरण दिन म्हणुन साजरा करण्यात आला. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ  दादा महाराज आयुर्वेदिक गार्डन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास अपर परिवहन आयुक्त मुंबई जितेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,  पोलीस अधिक्षक समीर शेख, प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सोनवणे, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रसचे संचालक प्रकाश गवळी तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 जिल्ह्यातील 38 ब्लॅकस्पॉटस् पोलीसांनी शोधून काढल्याचे सांगुन अपर परिवहन आयुक्त श्री. पाटील म्हणाले, त्या त्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी ते ठळकपणे दर्शविण्यात यावे. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची भूमिका रस्ता सुरक्षेच्याबाबतीत महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे सीटबेल्ट घालणे, हेल्मेट वापरणे, वेगमर्यादेचे उल्लंघन न करणे, सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

अशा प्रकारच्या कार्यक्रमातून वाहतुकीच्या नियमांची आठवण करुन देणे महत्वाचे असल्याचे सांगुन जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, वाहतुकीचे छोटे छोटे नियम जसे रस्ता ओलांडणे, सिग्नल पाळणे, चुकीच्या बाजुने न जाणे हे महत्वाचे आहे.

हिरकणी ग्रुप रायडर श्रीमती उर्मिला भोजणे, प्रविण शेळके व विनीत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व वाहतूक संघटना, सर्व रिक्षा व टॅक्सी संघटना, चालक प्रशिक्षण संस्था, वाहन वितरक संघटना आणि नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!