जागतिक हास्य दिन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माणूस हसणे विसरतो तेव्हा त्याच्यासमोर उदासीनता उभी राहते.माणूस हसण्याला हद्दपार करतो तेव्हा त्याच्या जीवनात दुःख हातपाय पसरते. हसणे ही आनंदाची अभिव्यक्ती आहे. ते आनंदाचे फुल आहे. तो कैवल्याचा देठ आहे. हसणे हाच विठ्ठल… कृष्ण आणि बुद्ध आहे. विठ्ठल हसला म्हणून संतांचा मळा फुलला. कृष्ण हसला म्हणून गाईगुरांना हंबर फुटला. गीता प्रकटली. बुद्ध हसला म्हणून मानवता निर्माण झाली. येशू हसला म्हणून जनसेवा अवतरली. पैगंबराच्या हसण्याने बंधूता गहिवरली. जो माणूस हसतच नाही, तो माणूस नव्हेच.

ज्याचं मन विकसीत आहे. त्यालाच विनोद कळतो. त्यालाच विनोद जगता येतो. विनोदी माणसं माणसाला जगायला शिकवतात. पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे, चिं. वि.जोशी, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, व्यंकेटश माडगूळकर, व. पू. काळे, मार्क ट्वेन, अब्राहम लिंकन, बिरबल, नसरुद्दीन मुल्ला, तेनालीरामा, चार्ली चाप्लीन, लॉरेल हार्डी इ. हे या पृथ्वीतलावरचे काही दिवसासाठी भटकायला आलेले देवदूतच म्हंटले पाहिजेत. त्यांनी हसण्याची अमरवेल पृथ्वीतलावर लावली आणि ते निघून गेले.

चर्चिल म्हणतात, “मला विनोदाने तारले. नाहीतर मी लहानपणीच मेलो असतो.” अब्राहम लिंकन, टॉलेस्टोयआणि सॉक्रेटिस म्हणतात, “जगात विनोद नसता तर आम्ही खचितच वेडे झालो असतो.” मार्क ट्वेन म्हणतो, “या विशाल स्वर्गभूमी पेक्षा पृथ्वी श्रेष्ठ आहे, कारण पृथ्वीवर विनोद आहे आणि माणसं एकमेकाला हसतात हसवतात.”

हसणं हे तसं पाहिलं तर महापुण्याचं काम मानले जाते. आणि हसवणारा महापुण्यात्मा समजला जातो. अशा महापुण्यवान विनोदवीरानी जगाला भरभरून हसू देताना त्यांनी व्यतीत केलेले आपले जीवन, यशाचं शिखर गाठताना त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष, अपयश, पराभव, चढउतार हा प्रत्येकाला त्याच्या जीवनात प्रेरणादायी ठरतो. म्हणूनच या हसवणाऱ्या हास्य विनोद वीराना हसण्याची अमरवेल लावणारे देवदूत म्हणतात.

आपलाच हास्ययात्री ​– प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!