पुणे येथे ६ऑक्टोबर रोजी “नैसर्गिक शेती” विषयी कार्यशाळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । पुणे । कृषी विभागामार्फत दि. 6 ऑक्टोबर, 2022 रोजी बालेवाडी, क्रिडा संकुल, पुणे येथे “नैसर्गिक शेती” विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत गुजरात राज्याचे राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत हे मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील कृषी मंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे व इतर मान्यवर हे उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीला देशात प्रोत्साहन देणे, रासायनिक खतांच्या मुख्यतः युरीयाचा वापर कमी करणे यावर भर देण्याचे निर्देश दिलेले आहेत. या दृष्टीने गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कुरुक्षेत्र हरियाणा येथे केलेले नैसर्गिक शेतीचे प्रयोग आणि प्रसार याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. श्री. देवव्रत यांनी कुरुक्षेत्र येथील गुरुकुलाची सुमारे 200 एकर शेती पुर्णत: नैसर्गिक शेतीमध्ये कशी परीवर्तीत केली आणि भविष्यात हा शाश्वत शेतीचा पर्याय कसा होऊ शकतो याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.

राज्यभरातून सुमारे 2000 शेतकरी या कार्यशाळेस उपस्थित राहतील. दुपारच्या तांत्रिक सत्रात तज्ञांचे मार्गदर्शन तसेच महाराष्ट्रात नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव कथन ऐकायला मिळणार आहे. या कार्यशाळेला जोडून नैसर्गिक शेतीबाबतच्या एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण कृषि विभागाच्या युट्युब चॅनलवर https://www.youtube.com/c/Agriculture DepartmentGoM करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय कार्यालये, कृषि विज्ञान केंद्र, कृषि संशोधन संस्था इ. ठिकाणी करण्यात येणार आहे.

तरी या कार्यशाळेच्या सुवर्ण संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!