दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । सातारा । येथील छत्रपती शिवाजी कॉलेज मधील इंग्रजी विभागाने ग्लोबल करिअरच्या संधी या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालयातून 150 विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. मा. प्राचार्य विठ्ठल शिवणकर, सचिव, रयत शिक्षण संस्था सातारा यांनी या कार्यासाठी मार्गदर्शन केले. प्रथम
सत्रात साधनव्यक्ती मा. धर्मराज शुक्ला, वैमानिक, मुंबई यांनी वैमानिक क्षेत्रातील वेगवेगळ्या संधीची माहिती दिली. केबीन क्रु, ग्राउंड स्टाफ तसेच पायलट म्हणून ही कला शाखेचे विद्यार्थी आपले करिअर घडू शकतात त्यासाठी संभाषण कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे, असे त्यांनी आपले मत व्यक्त केले तसेच सातारा जिल्ह्यातील मा. रसिकलाल तपासे यांनी मी कसा वैमानिक झालो? याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात साधनव्यक्ती मा. सौमित्र महाजन यांनी परकीय भाषा विशेषतः फ्रेंच, जर्मन, जापनीज, पोर्तुगीज इत्यादी भाषांचे महत्व करिअरच्या दृष्टीने पटवून दिले. तर तिसऱ्या सत्रात साधनव्यक्ती मा. संतोष कुडाळकर यांनी सॉफ्ट स्किल्स आणि करिअर याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्या व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. रोशनआरा शेख यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले तर प्रा. तानाजी देवकुळे यांनी प्रास्ताविक केले. सदर कार्यक्रमास इंग्रजी विभागाचे प्रा. राजेंद्र तांबिले प्रा. केशव पवार डॉ. बाबासाहेब कांगणे प्रा. रवींद्र महाजन प्रा. रामचंद्र गाडेकर प्रा. ओमप्रकाश पतगे आणि विद्यार्थी उपस्थित होते.