
स्थैर्य, फलटण, दि. ०७ ऑगस्ट : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत फलटण नगरपरिषदेमध्ये आज, दि. ७ ऑगस्ट रोजी शहरातील महिला बचत गटांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता या कार्यशाळेला सुरुवात झाली.
यावेळी ‘हर घर तिरंगा’ आणि ‘हर घर स्वच्छता’ अभियानांतर्गत उपस्थित महिलांना तिरंग्याची शपथ देण्यात आली. तसेच, तिरंग्यासोबत सेल्फी फोटो शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले. यासोबतच, महिलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत त्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पर्यावरण रक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षणार्थी महिलांना पेरू, आवळा, चिंच आणि सीताफळ यांसारख्या देशी प्रजातींच्या २०० रोपांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासोबतच सामाजिक आणि पर्यावरण विषयक जनजागृतीही साधली गेली.