स्थैर्य, मुंबई, दि. 18 : कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावताना महाराष्ट्र शासनाच्या माथाडी मंडळात नोंदणी असलेल्या माथाडी, वारणार, मापाडी व पालावाला महिला कामगार या घटकांचा अत्यावश्यक घटक म्हणून समावेश केला जावा. त्याला विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करण्यात यावे. या घटकांना रेल्वे प्रवास करण्यास परवानगी मिळावी, माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान झालेल्या संयुक्त बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य रोगाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने दि. 22 मार्च 2020 पासून देश व महाराष्ट्र राज्यात लॉकडाउन जाहीर केला होता. परंतु शासनाच्या आदेशानुसार नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कांदा-बटाटा मार्केट, मसाला मार्केट, अन्न-धान्य मार्केट, भाजीपाला व फळे मार्कट हे बाजार आवार सुरू असून या बाजारपेठां-मधून नागरिकांना अन्न-धान्य, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी बाजार आवारातील कामे चालू आहेत. महाराष्ट्र शासनाच्या माथाडी मंडळात नोंदीत असलेले माथाडी, वारणार, मापाडी व पालावाला, महिला कामगार मालाची चढ-उताराची कामे करत आहेत. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा झालेला नाही तसेच महाराष्ट्रातील इतर बाजार समित्या, केंद्र शासनाच्या गॅस व पेट्रोलियम कंपन्या, खत कारखाने, रेल्वे माल धक्के व इतर अत्यावश्यक सेवेतील व्यवसाय सुरू असून तेथे माथाडी कामगार कामे करत आहेत.
कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य रोगावर मात करीत आपला जीव मुठीत घेऊन माथाडी व सुरक्षा रक्षक कामगार आपले कर्तव्य बजावत आहेत. हे कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन काही सुरक्षा रक्षक व माथाडी कामगारांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यास औषधोपचाराच्या खर्चाची किंवा दुर्दैवाने मृत्यू आल्यास संबंधित सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत होण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू होणार्या कर्मचार्यांना विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने काढलेल्या दि.29 मे2020, च्या शासन निर्णयानुसार जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची लोडिंग, अनलोडिंग, थापी, वाराई व त्यानुषंगिक कामे करणार्या महाराष्ट्र शासनाच्या माथाडी मंडळात नोंदीत असलेल्या माथाडी, वारणार, मापाडी व पालावाला महिला कामगार या घटकांचा कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावणारा अत्यावश्यक घटक म्हणून समावेश केला जावा व त्याला विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करण्यात यावे, अशी मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केली आहे.