दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२२ । फलटण । सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी डोक्यातून राजकारण काढून टाका आणि आपली जबाबदारी, कर्तव्ये, कामकाज पद्धती समजावून घ्या, कोणत्या शासकीय योजना आपल्या गावासाठी उपयुक्त आहेत त्यांचा अभ्यास करा आणि त्या गावांसाठी उपलब्ध करुन घ्या असे आवाहन सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांना केले आहे.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत सातारा जिल्हा परिषद, फलटण पंचायत समिती आणि रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्रातर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांसाठी ३ दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय, फलटण येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते, गटविकास अधिकारी तथा प्रशासक डॉ. अमिता गावडे – पवार, प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, विस्तार अधिकारी महादेव चौधरी, पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव, प्रशिक्षक सुरेंद्र चव्हाण, धनाजी पाटील, अमोल जाधव, विद्याधर गायकवाड वगैरे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीचे कामकाज नियमानुसार, कायदेशीर मार्गाने चालले पाहिजे. भविष्याचा वेध घेऊन लोकसहभागातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त कामांचे नियोजन करा, त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक सदस्यांनी सर्वोत्तम योगदान देवून गावाचा सर्वांगीण विकास साधा अशी अपेक्षा श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी व्यक्त केली.
फलटण तालुक्यातील किमान एका ग्रामपंचायतीने कोणत्याही उपक्रम, योजनेत सहभागी होऊन राज्य आणि केंद्रीय स्तरावर आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळविण्यासाठी यशस्वी प्रयत्न करुन तालुक्याचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
ग्रामपंचायत कायदा, कामकाज, सभा, लेखा संहिता, नमुने १ ते ३३, अधिनियमातील ठळक तरतुदी, जल व्यवस्थापन, आपत्ती निवारण, ई – पंचायत व्यवस्थापन, शाश्वत विकास, पंचायत काल आज उद्या अशा विविध विषयांवर उपस्थित नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रारंभी गटविकास अधिकारी तथा प्रशासक डॉ. अमिता गावडे – पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात प्रशिक्षण शिबीराविषयी (कार्यशाळा) माहिती दिली.
या कार्यशाळेस साखरवाडी, तांबवे, कोळकी, पिराचीवाडी, खुंटे, भिलकटी, जाधववाडी, सोनवडी, अलगुडेवाडी, तिरकवाडी, सासकल, घाडगेवाडी, डोंबाळवाडी, निरगुडी, शेरेशिंदेवाडी, सस्तेवाडी, कापडगाव, रावडी बु|| या गावातील ८५ स्त्री व ६८ पुरुष असे एकूण १५३ नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते अशी माहिती फलटण पंचायत समिती ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी एस. एस. चौधरी यांनी दिली आहे.