दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । फलटण । आगामी काळामध्ये असणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुका व पालखी काळ हे आचारसंहितेच्या काळात एकत्र येत असल्याची शक्यता असल्याने फलटण शहरांमधील पालखी मार्गाची प्रलंबित सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे काम फलटण नगरपरिषदेच्या वतीने हाती घेण्यात आलेले आहे. आगामी काळामध्ये फलटण शहरातील कोणत्याही नागरिकांना सोयी सुविधांपासून वंचित रहावे लागणार नाही. फलटण शहरातील नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी फलटण नगरपरिषद कटिबद्ध असल्याची माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी केले आहे.
फलटण शहरामधील मलटण या भागांमधून पालखी मार्ग जातो व त्या पालखी मार्गाचे काम करणे हे गरजेचे आहे. आगामी काळामध्ये नगरपरिषदेच्या होणाऱ्या निवडणुका व पालखीचा काळ एकत्रित येण्याची शक्यता असल्याने फलटण नगरपरिषदेच्या वतीने फलटण शहरांमधील पालखी मार्गाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. लवकरात लवकर ते पूर्ण सुध्दा करण्यात येणार आहे, असेही प्रशासक संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले.
फलटण शहरामधील नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात येणार नाही. फलटण शहरातील नागरिकांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी फलटण नगर परिषद कटिबद्ध असून आगामी काळामध्ये शहराच्या व नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली कामे व प्रलंबित असलेली कामे सुद्धा पुर्णत्वास नेण्यात येणार आहेत, अशीही माहिती यावेळी प्रशासक संजय गायकवाड यांनी दिली.