फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गाचे काम अखेर सुरू

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर यश


फलटण, 12 ऑगस्ट – लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे स्वप्न असलेला व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम अखेर सुरू झाले आहे. या रेल्वे मार्गाचे कामाची सुरुवात माळशिरस तालुक्यात करण्यात आल्याचे वृत्त काही युट्युब चॅनेलच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले आहे. फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्ग संदर्भात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाल्यापासूनच त्यांनी फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गासाठी सततचा पाठपुरावा केला आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल, विद्यमान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे वारंवार मागणी करत फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गामुळे होणारे फायदे पटवून दिले आहेत.

फलटण आणि पंढरपूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणार्‍या या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव तब्बल दशकभरापूर्वी समोर आला होता. 2010 च्या सुमारास या प्रकल्पाची प्राथमिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात आला. मात्र निधीअभावी, प्रशासकीय अडथळे आणि जमीन संपादनातील अडचणींमुळे प्रकल्प दीर्घकाळ रखडला. दरम्यान, अनेक वेळा केंद्रीय रेल्वे अंदाजपत्रकात त्याचा उल्लेख झाला तरी प्रत्यक्ष कामाला गती मिळत नव्हती.

गेल्या दोन वर्षांत रेल्वे मंत्रालयाने प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक व आर्थिक मंजुरी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न वेगाने सुरू केले. या कालावधीत जमिनीच्या मोजण्या, सर्व्हेक्षण, भूयोजन, तसेच स्थानिक ग्रामस्थांशी चर्चेचे सत्र पार पडले. फलटण तालुक्यातील सुमारे 27 किलोमीटर आणि पंढरपूर तालुक्यातील 33 किलोमीटर असे एकूण 60 किलोमीटर अंतर असलेला हा मार्ग दोन जिल्ह्यांना (सातारा व सोलापूर) सरळ जोडणार आहे.

या मार्गामुळे फलटण, बारामती, पंढरपूर, सांगोला आणि परिसरातील शेतकर्‍यांना आपला माल, विशेषतः ऊस, डाळी, धान्य, कांदा, भाजीपाला इत्यादी पिके थेट रेल्वेने मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवणे सोपे होणार आहे. तसेच पंढरपूरच्या वारीला जाणार्‍या लाखो वारकर्‍यांसाठीही हा मार्ग अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे.

फलटण शहरातील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सांगतात, हा रेल्वेमार्ग फक्त प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित न राहता मालवाहतुकीला नवा पर्याय देईल. औद्योगिक गुंतवणूकदार आता फलटणकडे अधिक आकर्षित होतील. तसेच पंढरपूर येथे दरवर्षी लाखो भाविक येथे दाखल होतात. या रेल्वेमार्गामुळे पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागांतून भाविकांना थेट, कमी वेळेत आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळेल.

फलटण औद्योगिक वसाहतीत अनेक लघु व मध्यम उद्योग कार्यरत आहेत. पंढरपूर मार्गे दक्षिण महाराष्ट्र व कर्नाटकातील औद्योगिक पट्ट्यांशी सरळ रेल्वे जोडणी मिळाल्यास वाहतूक खर्च आणि वेळ दोन्हीची बचत होईल. स्थानिक उद्योगपतींच्या मते, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास निर्यात-आयात साखळीला गती मिळेल, विशेषतः शीतसाखळी आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी नवे दरवाजे उघडतील. फलटण-पंढरपूर रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर त्याला बारामती, सांगोला आणि मिरजेच्या मार्गाशी जोडण्याची योजना चर्चेत आहे. त्यामुळे हा पट्टा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा रेल्वे कॉरिडॉर ठरू शकतो.


Back to top button
Don`t copy text!