स्थैर्य, सातारा, दि. ०७ : कराड ते पाटण या मार्गावरील एल ॲण्ड टी कंपनीने अर्पूण अवस्थेत सोडलेले काम येत्या 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
चिपळून राष्ट्रीय महामार्गाच्या प्रंलंबित कामाचा आढावा गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी व्हिसीद्वारे घेतला. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले. या आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, अधीक्षक अभियंता प्रदिप आवटी, कार्यकारी अभियंता श्री. देशपांडे, एल ॲण्ड टी कंपनीचे प्रतिनिधी प्रदीप तावरे आदी उपस्थित होते.
संगमनगर ते घाटमाथा या एकूण 13.1 कि.मी. व रक्कम 16.85 कोटीच्या मजबूतीकरणाच्या कामास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे कार्यकारी अभियंता श्री. देशपांडे यांनी या बैठकीत सांगितले. रस्त्याचे काम तात्काळ सुरु करुन लोकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणा व कंत्राटदार यांनी घ्यावी, असे निर्देश देवून गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी कराड ते पाटण मार्गावरील अपूर्ण अवस्थेत सोडलेले काम 31 मे पूर्वी पूर्ण करावे. तसेच तेलेवाडी, नाडे, अडूळ या गावातील अपूर्ण असलेले काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. संबंधितांनी वेळेत काम पूर्ण न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही श्री. देसाई यांनी या बैठकीत केल्या.