
दैनिक स्थैर्य । 24 जुलै 2025 । सातारा। शहरातील हवेची गुणवत्ता समजावी, यासाठीची यंत्रणा सातारा पालिकेच्या मार्फतीने उभारण्यात येत आहे. यासाठीचे फलक उभारणीचे काम सध्या सुरू असून, हे डिजिटल फलक लवकरच कार्यान्वित होणार आहेत. शहरातील हवेचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढीस लागले आहे. हे प्रदूषण कमी करण्यासह हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
शहरातील हवेची गुणवत्ता तपासणीसाठी पालिकेस इतर शासकीय कार्यालयांच्या अहवालावर अवलंबून राहावे लागत होते. हे अवलंबित्व संपांवे, यासाठी पालिकेने शहराच्या विविध भागातील हवेची गुणवत्ता मोजणीची यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला होता.
यानुसार गोलबाग, भूविकास बँक चौक, गोडोली नाका आणि पालिका मुख्यालयात ती यंत्रणा उभारण्यात येत आहे.या यंत्रणेच्या माध्यमातून तपासलेली हवेची गुणवत्ता नागरिकांना समजावी, यासाठीचे डिजिटल फलक पालिका चार ठिकाणी उभारत असून, त्यापैकी एक गोलबागेत नुकताच बसविण्यात आला. हा फलक लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.