दैनिक स्थैर्य । दि. ०२ सप्टेंबर २०२२ । फलटण । कोरोना परिस्थितीचा अनुकुल परिणाम काही प्रमाणात मुद्रीत माध्यमांवर झाला असून अशा परिस्थितीत ‘स्थैर्य’ ने सोशल मिडीयाच्या माध्यमातून फलटणमधून जिल्हा स्तरावर सुरु ठेवलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे मत ए.बी.पी.माझा वृत्त वाहिनीचे नवी दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी व्यक्त केले.
मुळचे गिरवी (ता.फलटण) येथील व सध्या “ए.बी.पी.माझा” या वृत्तवाहिनीचे विशेष प्रतिनिधी म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत असलेले युवा पत्रकार प्रशांत कदम व “बीबीसी मराठी” दिल्ली येथे विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत असणार्या सौ. अमृता प्रशांत कदम यांनी ‘स्थैर्य’च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी झालेल्या अनौपचारिक संवादाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, ‘स्थैर्य’चे संपादक प्रसन्न रुद्रभटे, पत्रकार किरण बोळे, रोहित वाकडे, शंतनु रुद्रभटे, महेश सुतार, केदार गोसावी, अमित पंडित, प्रकाश गुरव आदींची उपस्थिती होती.
फलटणसारख्या तालुक्याच्या ठिकाणावरुन काम करत असताना ‘स्थैर्य’ बातमीदारीत नेहमीच अग्रेसर राहत असल्याचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून वारंवार पहायला मिळत असते. ‘स्थैर्य एक्सप्रेस’ या इंग्रजी साप्ताहिकाचा प्रयोगही उत्तम आहे असे सांगून प्रशांत कदम यांनी ‘स्थैर्य’च्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रसन्न रुद्रभटे यांनी ‘स्थैर्य’च्यावतीने प्रशांत कदम यांना फलटण नगरीचे ग्रामदैवत प्रभू श्रीरामांची प्रतिमा भेट दिली तर रविंद्र बेडकिहाळ यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने प्रशांत कदम यांना पुस्तके भेट देवून शुभेच्छा दिल्या.