
दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२१ | सातारा | पायाभूत सुविधा रोजगार व तंत्र प्रधान शिक्षणाच्या सोयींनी समृद्ध सातारा घडवायचा असेल तर सर्व सातारकरांनी मरगळ झटकून कामाला लागायला हवे . पायाभूत विकासाचे प्रस्ताव द्या निधी उपलब्ध करायची जवाबदारी माझी आहे . भविष्यकालीन सातारा जिल्हा विकासाचा ब्रँण्ड बनवायचा आहे त्यामुळे सर्व सातारकरांनी आपली जवाबदारी समजून उद्याच्या साताऱ्यासाठी पुढे यावे असे कळकळीचे आवाहनं खासदार उदयनराजे भोसले यांनी केले .
साताऱ्याची विकासाच्या दृष्टीने भविष्यकालीन वाटचाल या संवेदनशील आणि कळीच्या मुद्यावर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात साताऱ्यावर बोलू काही या उपक्रमाअंतर्गत खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट तरूणाईशी अराजकीय स्वरूपाचा संवाद साधला . व्यापार, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल, चित्रपट व्यवसाय, आरोग्य, उद्योजक इं क्षेत्रातील अनेक नामवंत व व्यवसाय निष्णातं मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होती . यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी व पटकथा लेखक राजीव मुळये, व तनया भुर्के यांनी उदयनराजे यांच्याशी प्रश्नोत्तर व निवेदनं स्वरूपात संवाद साधत त्यांना बोलते केले .
उदयनराजे पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळी सुविधांच्या अभावामुळे सातारकरांना पोटापाण्यासाठी पुणे मुंबई येथे स्थलांतरित व्हावे लागले . छत्रपती शिवरायांना सृजनात्मक विचार आणि कृतीतून स्वराज्य उभे केले तोच रचनात्मक विचार आता साताऱ्याच्या पुढील वाटचालीसाठी करायचा आहे . माहिती तंत्रज्ञान, तंत्रज्ञान शिक्षण रोजगार पायाभूत सुविधा यांचा विस्तार करायचा असेल तर संवादसेतू निर्माण व्हायला हवा . सातारा एमआयडीसीत रोजगार यायला हवा . येथे 47 एकरावर वसलेली महाराष्ट्र स्कूटर कंपनी कशी सुरू होईल याचा पाठपुरावा करू, उद्योजकांना स्वस्त दरात वीज मिळेल यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे तुम्ही प्रस्ताव द्या तातडीने वीज मंत्र्यांशी बैठक लावू, तसेच सातारा शहराच्या पर्यटन वृध्दीचे एमटीडीसीच्या माध्यमातून अनेक प्रस्ताव आहेत . पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून या प्रस्तावांसाठी निश्चित पाठपुरावा करू . जिल्ह्याचा चित्रपट रोजगार, तसेच देगाव व निगडी येथील प्रस्तावित औ क्षेत्रांचे रखडून पडलेले प्रस्ताव, मूळ सातारा शहर व हद्दवाढीतील नव्या भागांचा सुनियोजित विकास, व तेथील पायाभूत सुविधांचा विस्तार या करिता विविध प्रस्ताव तयार करण्यात आले असून सातारा झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी पंतप्रधान आ वास योजनेअंर्तगत कामांना सुरवात झाली आहे . हद्दवाढीच्या नव्या भागात सर्व खेळांचा समावेश असलेले पुन्हा नवीन सिंथेटिक ट्रॅकचे नवे स्टेडियम असा शब्द उदयनराजे यांनी दिला . मात्र सातारकरांची प्रत्यक्ष लोकसहभागाची जवाबदारी आहे त्यासाठी त्यांनी झपाटून कामाला लागायला हवे . पायाभूत सुविधांचे जे प्रस्ताव असतील ते थेट मला सादर करा त्याकरिता जागा व निधी उपलब्ध करण्याची जवाबदारी माझी असेल . भविष्यात सातारा विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी आपल्यात स्पर्धा व्हायला हवी ,साताऱ्याच्या विकासाचा हा रेटा संयुक्तिक हवा यामध्ये मी एकटा काही करू शकणार नाही , सातारा घडवायचाय तर प्रत्येकाने हिरिरीने पुढे यायला हवे असे आवाहन उदयनराजे यांनी केले .
मासचे अध्यक्ष नाना देशमुख, आयटी प्रोफेशनलिस्ट पवनजीत माने, पर्यटन विकास तज्ञ अमित कदम, अभिजीत माने, शैलेंद्र करंदीकर, हॉटेल व्यावसायिक राजू भोसले, कापड व्यावसायिक सुदीप भट्टड, मल्लखांब प्रशिक्षक सुजीत शेडगे, वास्तुविशारद नेहा शेडगे, क्रेडाईचे सरचिटणीस प्रसिध्द विकसक अॅड माजीद कच्छी, ज्येष्ठ निर्माते तेज पाल वाघ,ढाणे इंजिनियरिंग क्लासेसचे संचालक विशाल ढाणे, सौरभ भोसले, लोकेश उत्तेकर इं मान्यवर मंडळीनी त्यांच्या क्षेत्रातील समस्यांचा आढावा घेऊन साताऱ्या पुढील विकासाची काय आव्हाने आहेत याची आटोपशीर मांडणी केली .
खासदार उदयनराजे यांचे समर्थक व युवा उद्योजक संग्राम बर्गे व उदयनराजे मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . पूर्णतः अराजकीय स्वरूपाचा उदयनराजे यांनी थेट सातारकरांशी केलेला संवाद उपस्थितांना चांगलाच भावला . जिल्हा बँकेचे सभागृह सातारकरांच्या गर्दीने फुलून गेले होते .
उदयनराजे यांची पुन्हा सिग्नेचर पोझ
अराजकीय स्वरूपाच्या थेट संवाद कार्यक्रमात खासदार उदयनराजे त्यांच्या नेहमीच्या शैलीदार अंदाजात दिसले . अगदी जोश मध्ये उदयनराजे यांनी कॉलर उडवित एक बार मैने जो कमिटमेंट कर दी तो ….. असा डायलॉग मारलाच . उदयनराजेंच्या या स्टाईलला त्सभागृहातील तरुणाईची जोशपूर्ण दाद मिळाली . जे काहीच काम करत नाही तेच नेहमी साताऱ्यात काहीच घडत नसल्याची टीका करतात असा टोमणा त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना पुन्हा लगाविला . साताऱ्यात शाहू स्टेडियमचे काम अत्यंत चुकीचे झाले त्यामुळे शहरातील मोक्याची जागा गेली . तत्कालीन विकसक व तत्कालीन पालकमंत्री कोण ? हे तुम्हीच शोधा मी सांगायला नको अशी राजकीय शेरेबाजी उदयनराजे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव न घेता केली . सातारा शहराच्या रचनात्मक विकासासाठी Udyanrajebhosale. Com या संकेतसळाचे अनावरण उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले . अनिमेष कुलकर्णी व अजय म्हैसेकर यांच्या झेरिको फार्मा या औषध उत्पादक कंपनीचे साताऱ्यात लॉंचिंग झाल्याची घोषणा उदयनराजे यांनी यावेळी केली .