दैनिक स्थैर्य । दि.२२ मार्च २०२२ । सातारा । गरिबांचे आधारवड असलेल्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये गरोदर मातांची पिळवणूक होत असून ती तात्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा रिपाइं (ए)च्या महिला आघाडीच्यावतीने अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास कदम यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
गरोदर मातांवर राज्य व केंद्र सरकार लाखो रुपये खर्च करत आहे. वेगवेगळ्या योजना सुविधा दिल्या जात आहेत. असे असताना सुद्धा सिव्हीलमध्ये मात्र, गरोदर मातांची पिळवणूक सुरू आहे. एकंदरच प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सर्व तपासण्या होत असताना सुद्धा काही तपासण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे जावे लागते. यावेळेस पाच महिन्याच्या गरोदर मातेच्या सोनोग्राफीसाठी बाहेरच्या लॅबची चिठ्ठी दिली जाते. त्यामध्ये काही डॉक्टर व संबंधित लॅबचे लागेबांधे आहे. संबंधित लॅबवाले 1700 ते 2000 रुपये आकारले जातात. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांची पिळवणूक होते. अशा प्रकारच्या होणारा भ्रष्टाचार व पिळवणूक त्वरित थांबवावी. अन्यथा, राज्य उपाध्यक्ष दादा ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्षा उषा गायकवाड, पूजा बनसोडे, अमृता मोरे, तेजश्री गोंजारी, ममता पवार, तेजल गायकवाड आदी उपस्थित होते.