
दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑक्टोबर २०२२ । फलटण । कृषी प्रधान भारत देशात शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो परंतू आता दुग्ध व्यवसायामध्येही व्यावसायीक दृष्टीकोन स्विकारण्यात येत असताना त्यामध्ये महिलांचे योगदान आहे, तथापि अधिक महिलांनी या व्यवसायामध्ये पुढे येणे गरजेचे असल्याचे स्पष्ट प्रतिपादन गोविंद मिल्क ॶॅण्ड मिल्क प्रॉडक्ट प्रा. लि., फलटणच्या संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
पुणे येथे आयोजित फीड टेक एक्सपो २०२२ चे उद्घाटन श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नुकतेच समारंभपूर्वक झाले, याप्रसंगी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या चेअरमन सौ. पवार, बेन्सन मिडियाचे आनंद गोरड, प्राची अरोरा, दत्तात्रय शिंदे, भीमराव जमदाडे आणि मोठ्या संख्येने दूध व्यवसायिक उपस्थित होते.
हा व्यवसाय करताना महिलांनी यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आपले कष्ट कसे कमी होतील व आपले उत्पादन कसे वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगताना गोविंद मिल्क ॶॅण्ड मिल्क प्रॉडक्ट प्रा. लि.,फलटणच्या माध्यमातून अनेक नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात येत असून यामध्ये कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा की, ज्यामध्ये कष्ट कमी होतात, जनावरांचे आजार कमी होतात व जनावरांना आराम मिळाल्याने कमी कष्टात जास्त दूध उत्पादन मिळते तसेच चाऱ्याचे नियोजन करत असताना आपणाकडे बारमाही हिरवा चारा उपलब्ध होत नाही परंतू मुरघास केला तर बारमाही हिरवा चारा या मुरघासाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
बेन्सन मेडिया यांनी आयोजित केलेले फीड टेक एक्सपो २०२२ हा उपक्रम कौतुकास्पद असून यामुळे दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आणि त्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरास प्रोत्साहन नक्कीच मिळेल असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी आनंद गोरड व मिस प्राची अरोरा यांचे कौतुक केले व डेरी इंडस्ट्रीतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अशी प्रदर्शन महत्त्वाची असल्याचे आवर्जून सांगितले.