मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात महिलांचा सहभाग मोठा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ मे २०२२ । मुक्ताईनगर । दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी यात्रा विक्रमी होण्याचे अंदाज असताना पालखी सोहळ्यांसोबत चालणाऱ्या भाविकांच्या संख्येत तब्बल 40 टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या वारकऱ्यांमध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय असते. वारीमध्ये बऱ्याचदा महिला वारकऱ्यांची आरोग्याच्या दृष्टीनं हेळसांड होताना दिसते. विशेष करुन संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात महिलांची संख्या समाजाच्या ८० टक्के असते . या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगानं महत्वाचा निर्णय घेतला आहे.

वारी काळात दर दहा ते वीस किलोमीटर अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय आणि न्हाणी घराची व्यवस्था असावी तसेच सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन असणे आवश्यक आहे, असं महिला आयोगानं सांगितलं आहे. सोबतच वारीदरम्यान स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी, मंदिर परिसरात दर्शनी भागात लावावेत,असंही महिला आयोगानं सांगितलं आहे.

अशा सुविधा या वर्षाच्या वारीपासून महिला वारकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील. याबाबतीत पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतीत निर्देश देण्यात आलेले आहेत.

देहू आणि आळंदी देवस्थानांच्या विश्वस्तांनी बैठक सकारात्मक

दरम्यान काल देहू आणि आळंदी देवस्थानांच्या विश्वस्तांची बैठक पार पडली. ही बैठक सकारात्मक झाल्याचं सांगण्यात आलं आहे. वारीच्या आधी जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी म्हटलं की, दोन वर्षांनंतर यावर्षी पायी पालखी सोहळा होणार आहे. कोरोनामुळे 2 वर्ष पालखी सोहळा झाला नव्हता. संख्या खूप जास्त होणार असल्याने तयारी सुरू झाली आहे. आम्ही संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी करत तिथं काय करण्याची आवश्यकता आहे, याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. पुन्हा एकदा त्या सगळ्याचा आढावा घेण्यात आला असून जी कामे प्रलंबित आहेत ती लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, असं देशमुख यांनी सांगितलं. शौचालयाची संख्या दीड पटीने वाढवली असून सगळ्या मुक्कामी ठिकाणी योग्य ती व्यवस्था करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या ज्या सूचना आहेत त्या सगळ्या पाळल्या जातील. जी रस्त्याची कामे आहेत ती देखील 10 जूनपर्यंत पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर पाणी, लाईट याची देखील योग्य व्यवस्था करण्यात येणार आहे, असं देशमुख यांनी सांगितलं.

आषाढी वारीसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होतात. यंदा ही पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असेल. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचेल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून 21 जूनला प्रस्थान करणार आहे. दोन वर्षे कोरोनामुळं पायी वारीत खंड पडला होता.

मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात महिलांची संख्या ८० टक्के

मुक्ताईनगरहून दि . ३ जून रोजी निघणा-या संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यासोबत यंदा महिला वारकऱ्यांची संख्या तिपटीने वाढण्याची शक्यता असून या वारीत ८० टक्के महिलाच अधिक असतात . या महिलांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर असतो . याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही . शासनाने या महिलांसाठी आरोग्यासह पाणी , शौचालय , वीज व सुरक्षा व्यवस्था पुरवावी अशी मागणी श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र उर्फ भैय्यासाहेब पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे .


Back to top button
Don`t copy text!