
दैनिक स्थैर्य । 7 एप्रिल 2025। सातारा । सातारा शहरांमध्ये महिला क्रिकेट सामन्यांचा आयपीएल थरार दि. 11 ते 13 या कालावधीत अर्कशाळानगर, शाहपुरी येथील अॅस्ट्रो टर्फवर रंगणार आहे. या आयपीएल सामन्यांचे उद्घाटन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव कमलेश पिसाळ अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या हस्ते केला जाणार असल्याची माहिती संयोजक अभिलाषा दळवी, सुरभी वाखरिया, पायल शहा, श्रुती चव्हाण, तृप्ती भोईटे, वृषाली भंडारी, राणी शाह ऐश्वर्या पाटील, भाग्यश्री लाहोटी, सुरभी लुनावत, तनवी मोरे, गौरी गुरव यांनी दिली.
ही सातार्यातील महिलांसाठी ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा आहे. ही स्पर्धा व्यावसायिक स्वरूपात पहिल्यांदाच सातार्यात भरवली जात आहे. या स्पर्धेतून मैत्रीपूर्ण स्पर्धे ची भावना निर्माण करणे आणि खेळांमध्ये महिलांची भूमिका अधोरेखित करणे हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे महिला संयोजकांनी स्पष्ट केले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण बारा संघ सहभागी होणार असून प्रत्येक संघात दहा खेळाडू असणार आहेत. सामने सहा शतकाचे होणार असून दिवसाला चार सामने भरवले जाणार आहेत.
या स्पर्धेत प्रत्येक संघाचे किमान दोन सामने होणार आहेत. लाईनेस स्ट्रायकर, राजधानी सातारा, हीलिंग वॉरियर्स, गर्ल्स पावर, गुलाब गैंग, झुलेलाल, लक्ष्मी सुपर क्कीन, स्फूर्ती सुपर वूमन, पीएनव्हीएम टेन, पॉवर पँथर, स्फूर्ती वॉरियर्स आणि टीम पैंथर असे बारा संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धांमध्ये महिला वगळता व खेळाडूंचे नातेवाईक यांच्याशिवाय कोणालाही प्रवेश राहणार नाही. महिला प्रेक्षकांसाठी हे सामने मोफत आहेत. प्रत्येक सामन्यासाठी दोन अनुभवी पंच आहेत. ढोल ताशा पथकाच्या वादनाने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. सीजन विजेता संघाला ट्रॉफी उपविजेता संघाला ट्रॉफी सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू प्रत्येक सामन्यासाठी सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.