
स्थैर्य, फलटण, दि. २७ ऑगस्ट : महिलांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना आणि बीज भांडवल योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे अन्नप्रक्रिया उद्योग उभारावेत व आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. निखील मोरे यांनी केले. आत्मनिर्भर शहर स्तर संघ आणि फलटण नगरपरिषदेच्या वतीने, बीज भांडवल प्राप्त झालेल्या बचत गटांतील महिलांसाठी आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.
या कार्यशाळेमध्ये जिल्हास्तरीय मुख्य प्रशिक्षक श्री. लीनेश निकम यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी विविध लघुउद्योग, शासनाच्या संबंधित योजना, उत्पादनांचे आकर्षक पॅकेजिंग, मार्केटिंगची आधुनिक तंत्रे आणि अन्नसुरक्षा मानांकनाचे महत्त्व यांसारख्या विषयांवर चित्रफितींच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. या माहितीमुळे महिलांना उद्योग उभारणीसाठी नेमके काय करावे, याची दिशा मिळाली.
या योजनेतून कर्ज आणि अनुदान मिळवून यशस्वीपणे उद्योग चालवणाऱ्या उद्योजिका महिलांनीही यावेळी आपले अनुभव कथन केले, ज्यामुळे उपस्थित महिलांना मोठी प्रेरणा मिळाली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या फलटण विभाग प्रमुख सौ. संजना आटोळे यांनी ‘उमेद’ अभियानाच्या विविध योजनांची माहिती दिली, तर विभाग प्रमुख सौ. मनाली शेटे यांनीही महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाला एकूण ५० महिला उपस्थित होत्या. त्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले आणि भविष्यात अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर अभियान व्यवस्थापक श्री. शिंदे, श्री. शिरतोडे आणि व्यवस्थापक सौ. विद्या रिठे यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.