दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑक्टोबर २०२१ | सातारा | महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प हे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीनी व महिला यांना स्वसंरक्षण करण्यासाठी व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयोगी ठरतील, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केले.
सातारा येथे महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पांतर्गत महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीराचा समारोप श्री. देसाई यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोराडे, सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. देसाई म्हणाले, समाजात विकृत मनोवृत्तींच्या लोकांमुळे विद्यार्थिंनीना,महिलांना त्रास होत असतो. या अपप्रवृत्तींना धाक बसविण्यासाठी महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पामुळे मदत होणार आहे. पोलीस विभागातील महिला प्रशिक्षणार्थीकडून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिंनींना ज्युडो कराटेचे प्रशिक्षण दिले जाते. हा प्रकल्प सातारा जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व खेड्यांत शाळा महाविद्यालयांत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पोलीस विभाग, शिक्षण विभाग आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले.
सातारा शहरातील आठ शाळांतील 521 विद्यार्थीनींनी या सराव शिबीरामध्ये सहभाग घेतला. प्रशिक्षण शिबीरातील सहभागी विद्यार्थींनींना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी सातारा शहरातील विद्यालयातील विद्यार्थिंनी व पालक उपस्थित होते.