
दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२२ । फलटण । सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये स्त्रियांच्यावर घराबरोबर घराबाहेरच्या अनेक कामांची जबाबदारी येत असल्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळत नाही, अशा परिस्थितीमध्ये शारीरिक व मानसिक संतुलन ठेवण्यासाठी स्त्रीयांनी योग व प्राणायाम करणे आवश्यक असल्याचे योगगुरु सौ. रेखाताई खिलारे यांनी सांगितले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या चौधरवाडी हायस्कूल येथे आयोजित हळदी-कुंकू समारंभाच्या निमित्ताने मार्गदर्शक म्हणून योग गुरु सौ. रेखाताई खिलारे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी चौधरवाडीच्या सरपंच सौ. प्रतिभा चौधरी होत्या तर हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित गायकवाड, अबॅकस शिक्षिका सौ. पद्मजा जंगम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. सुजाता चौधरी, शिक्षक कांतीलाल चव्हाण, संजय शिंदे, सौ. उर्मिला घाडगे उपस्थित होते.
सौ. रेखाताई म्हणाल्या, आजच्या काळातील स्त्रिया घराबरोबर नोकरी किंवा व्यवसायाची जबाबदारी पार पाडत आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्य व मनावर परिणाम होऊन त्याचा जीवनावरही परिणाम होतो, यातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक स्त्रीने दिवसातून एक तास स्वतःसाठी देवून योग व प्राणायाम केले पाहिजेत.
मुख्याध्यापक अजित गायकवाड यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी, तर कांतीलाल चव्हाण यांनी समारोप व आभार मानले. चौधरवाडीतील स्त्रिया उपस्थित होत्या.