स्थैर्य, सातारा, दि. ०९: सातारा- आजच्या स्पर्धेच्या युगात कुटुंबाचा गाडा चालवताना मानवाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. महागाई आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे केवळ पुरुषांच्या खांद्यावर संसाराचे ओझे न टाकता स्त्रियांनीही संसारासाठी हातभार लावणे गरजेचे असून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे ही काळाची गरज आहे, असे मत कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी व्यक्त केले.
शाहूनगर येथे गुडलुक अँड फॅशन्स लेडीज शॉपीचे उदघाटन करताना सौ. वेदांतिकाराजे भोसले बोलत होत्या. यावेळी नगरसेवक अविनाश कदम, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रमिला जाधव, भारती गायकवाड, पूनम गायकवाड, चंद्रसेन सानप, चंद्रकांत रेडेकर, अमर बेंद्रे, सनी भिसे, विष्णू जाधव, अनंता वाघमारे, राहुल पवार, सचिन खंडाईत आदी उपस्थित होते. यावेळी सौ. वेदांतिकाराजे यांनी ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
निसर्गचक्रातील बदल, अनियमित पाऊस, अतिवृष्टी, गारपीट अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे मानवी जीवन संकटात सापडले आहे. वाढती लोकसंख्या, महागाईमुळे संसार चालवण्यासाठी प्रत्येकाला कसरत करावी लागते. त्यामुळे महिलांनी छोटेमोठे व्यवसाय थाटून स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि संसाराचा गाडा हाकण्यासाठी हातभार लावला पाहिजे. बचत गट स्थापन करून स्वतःसह इतर महिलांनाही आर्थिक सक्षम करण्यासाठी महिलांनी प्रयत्न करावा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले.