दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२२ । मुंबई । पारंपरिक हस्तकला, वस्त्रोद्योग, हातमाग, पारंपरिक कलाकुसरी आदींच्या माध्यमातून जवळपास ३० हजार महिलांच्या जीवनात परिवर्तन आणणाऱ्या आणि प्रतिष्ठेचा नारीशक्ती पुरस्कार विजेत्या श्रीमती रुमा देवी यांनी आज राज्याचे कौशल्य विकास, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली.
श्रीमती रुमा देवी यांचे ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणात फार मोठे योगदान असून त्यांच्या अनुभवाचा राज्यात उपयोग करून घेतला जाईल. महिला बचतगटांचे सक्षमीकरण, त्यांचा कौशल्य विकास यासाठी श्रीमती रुमा देवी यांच्यामार्फत विविध प्रशिक्षणे घेण्यासाठी त्यांचे सहकार्य घेतले जाईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
श्रीमती रुमा देवी या बारमेर जिल्ह्यातील (राजस्थान) आहेत. त्यांनी सुरुवातीला बचतगटांच्या माध्यमातून काही महिलांना सोबत घेऊन पारंपरिक हस्तकला, पारंपरिक वस्त्रोद्योग यांचा व्यवसाय सुरू केला. पुढील काळात या चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. श्रीमती रुमा देवी यांच्या चळवळीशी सुमारे 30 हजार महिला जोडल्या गेल्या आहेत, ज्यांना शाश्वत रोजगार प्राप्त झाला आहे.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, ग्रामीण, आदिवासी महिलांच्या विकासासाठी श्रीमती रूमा देवी यांनी केलेले कार्य अद्भुत असे आहे. या क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा महाराष्ट्रातही उपयोग करून घेण्यात येईल. येथे विविध प्रकारची कौशल्य विकासविषयक प्रशिक्षणे आयोजित करणे, महिलांना मार्गदर्शन करणे यासाठी रूमा देवी यांचे सहकार्य घेण्यात येईल. लवकरच विभागामार्फत या संदर्भात निर्णय घेऊ, असे मंत्री. श्री. लोढा यांनी सांगितले.