
उद्योजक राम निंबाळकर यांच्या संकल्पनेतून निंबळक येथे महिला आरोग्य व उद्योजकता शिबिर उत्साहात पार पडले. डॉ. सौ. साईयुक्ताराजे खर्डेकर यांनी महिलांना आरोग्याची काळजी घेण्यासोबतच स्वतःचा उद्योग सुरू करून स्वावलंबी होण्याचा कानमंत्र दिला.
स्थैर्य, निंबळक, दि. ०५ जानेवारी : ग्रामीण भागातील महिलांनी केवळ ‘चूल आणि मूल’ यामध्येच अडकून न पडता आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची वेळ आली आहे. याच उद्देशाने उद्योजक मा. श्री. राम निंबाळकर यांच्या दूरदृष्टीतून आणि संकल्पनेतून निंबळक येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला आरोग्य जागरूकता आणि उद्योजकता मार्गदर्शन’ शिबिराला महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. यावेळी डॉ. सौ. साईयुक्ता राजे खर्डेकर यांनी उपस्थित महिलांना आरोग्यासह प्रगतीचा मूलमंत्र दिला.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सौ. साईयुक्ता राजे खर्डेकर यांनी महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नावर बोट ठेवले. “ग्रामीण भागातील महिला सतत कुटुंबासाठी राबत असतात, पण स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. बदलत्या जीवनशैलीनुसार आता स्वतःची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. नियमित आरोग्य तपासणी आणि सकस आहार याकडे महिलांनी लक्ष दिलेच पाहिजे,” असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
केवळ आरोग्यावर न थांबता त्यांनी महिलांना आर्थिक स्वावलंबनाचे धडे दिले. “घराचा उंबरठा ओलांडून आता महिलांनी उद्योजकतेकडे वळले पाहिजे. स्थानिक संसाधनांचा (Local Resources) वापर करून छोटे-मोठे गृहद्योग सुरू करावेत. यासाठी शासनाच्या अनेक योजना आणि बाजारपेठेच्या संधी उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहा,” असा आत्मविश्वास त्यांनी महिलांमध्ये जागवला.
उद्योजक राम निंबाळकर यांच्या पुढाकाराने राबवलेल्या या उपक्रमामुळे निंबळक परिसरातील महिलांना एक नवी दिशा आणि ऊर्जा मिळाली आहे. ग्रामीण विकासात महिलांचे योगदान वाढवण्यासाठी अशा शिबिरांची नितांत गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी निंबळकच्या सरपंच सौ. सिमा बनकर, उपसरपंच सौ. गौरी ढमाळ, माजी उपसरपंच सौ. जयश्री मोरे, माजी सरपंच सौ. मोहिनी मतकर, माजी सरपंच सौ. संगिता निंबाळकर, माजी सरपंच श्रीमती लक्ष्मीबाई कापसे, माजी सरपंच सौ. मंदाकिनी निंबाळकर, माजी उपसरपंच सौ. मंगल जाधव यांच्यासह आजी-माजी महिला पदाधिकारी आणि ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
