
दैनिक स्थैर्य । 8 मार्च 2025। सातारा । पुरुषाप्रमाणे स्त्रियांना देखील तिचे नैसर्गिक अधिकार संविधानिक अधिकार वापरता यावेत ही भूमिका सर्वांची असते ,पण मग प्रत्यक्षात ही विषमता का राहते ? असा प्रश्न आपल्याला पडतो. तर त्याला कारण बहुतांशी परंपरेत आढळते. शारीरिक बळ जास्त असल्याने समाज,समुह रक्षणाची जबाबदारी बहुतांशी पुरुषाकडे होती. बहुतांशी नेतृत्व पुरुषांचे असल्याने,आणि देश परदेशात व्यापार,उद्योग, शिक्षण, शासन, प्रशासन, राजकारण, कायदा, शास्त्र, गणित, तंत्रज्ञान, विज्ञान, लष्कर, नौदल, हवाईदल, पायलट, कमांडो, बँकिंग, खेळ, क्रीडा, स्थापत्य, अभियांत्रिकी, चित्रपट, माध्यमे, पोलीस दल, दळण वळण साधनांचे संचलन, शेतीचे निर्णय, जमीन मालकी,राजकीय विश्लेषक, धोरण ठरविण्याची क्षेत्रे, इत्यादी अनेक क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी होती. तर स्त्रिया या घरगुती आणि कौटुंबिक जबाबदार्या घेत राहिल्या.
पुरुषाला इतर क्षेत्रात सतत संधी मिळाली, त्याला कारण सामाजिक भेदभाव असण्याचा व स्त्री पुरुष कामाच्या वर्गीकरणाचा वारसा जिथे जिथे आहे तिथे स्त्रिया या अन्य क्षेत्रात वंचित राहिल्या असल्याचे आढळते. स्वच्छता,स्वयंपाक,बाल संगोपन,वृद्धांची काळजी घेणे, कुटुंबाची काळजी वाहणे यातच स्त्रियांनी विना वेतन समर्पण केल्याचे आढळते.निर्णय घेण्याची संधी न देणे,किंवा स्त्रीला सुरक्षित ठेवण्यासाठी तिला घरातीलच कामे देणे, किंवा मग मुल जन्माला घालण्याची नैसर्गिक जबाबदारी तिच्याकडे असल्याने अनायासेच तेच काम तिच्याकडे देणे या बाबी घडलेल्या आहेत. भांडी घासा, दळा, तळा, धुणी धुवा,शिवा, खुरपा, फरशी पुसा, पोरांकडे लक्ष द्या, शेतात काम करा, स्वयंपाक करा, जेवण बनवा, सजा , धजा, पाहुण्यारावळ्याची सेवा करा, मिरच्या कुटा, चटणी करा, आर्थिक स्थिती चांगली नसल्यास मजुरीला जा, गवंड्याच्या हाताखाली काम करा, दुसरयाची धुणी भांडी करा, भाजी विका, अंडी विका, दुध -तूप माळवे विका, शेरडे करडे याकडे लक्ष द्या, डाळी डूळी तयार करा. नवर्याच्या कामात मदत करा, पोराला शाळेला न्या, बाळंतपण करा, झाड पाल्याची औषधे तयार करा, गुरा ढोरांना खायला घाला, पाणी पाजा, वैरण काडी आणा, कणसे खुडा,विहिरीचे, ओढ्याचे पाणी आणा , गाणी म्हणा, भजनाला जा ,बुवा महाराज यांची सेवा करा, संधी असेल तर नृत्य करा,देवदेव करा,पोरांची शी -शु काढा,गुरांचे शेण काढा,शेणाने सारवण करा, चुलीला पोतेरा द्या, सटवाई पूजा ,थोडक्यात फक्त कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, तिचा बाहेरील जगाशी संबंध कमी असावा, ही कुटुंबात भूमिका असल्याने तिला रांधा वाढा अन उष्टी काढा यातच रहावे लागत असे. भारतीय स्त्रिया जिथे जन्मास आल्या तिथे समर्पित होऊन अखंड कार्यरत राहिल्या आहेत.
अगदी 19 व्या शतकापूर्वीची परिस्थिती बघितली तर स्त्रीलाच काय अस्पृश्य असलेल्याना देखील शिक्षण नव्हते. देशात जातीय व धार्मिक विषमता होती. स्त्री ला प्रवास ,नोकरी व उद्योगधंदा करण्यास तसा मज्जावच होता. बाहेर कुठे कामाला जावे तर तिथे लैन्घिक अत्याचार होण्याची भीती होती. त्यामुळेच भारतीय स्त्रिया या परंपरावादी आहेत असे आजही म्हटले जाते. आपण आज भारतात संविधानिक स्वातंत्र्य याची चर्चा करतो,पण त्याकाळी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते. अजूनही नवर्याला ‘मालक’ या नावाने संबोधले जाते.
मालकाचे अधिकार वेगळे आणि मालकिणीचे वेगळे ,अशातच धर्मसंस्था व समाज ,जात यांचे नियम पालन करावे लागत. शिक्षणच नसेल तर जग कसे कळेल ? प्रवासच नसेल तर जग कसे कळेल ? 7 च्या आत घरात हे फक्त स्त्रीलाच होते, त्यामुळे नेतृत्व गुण, जगातील विविध क्षेत्रातील व्यवहारी ज्ञान त्यांना मिळूच शकत नव्हते. इतिहासात कोणाचीही सत्ता असली तरी स्त्रियांचे अब्रू रक्षण यालाच अधिक महत्व दिले आहे. स्त्री ही भोग घेण्याचा विषय आहे ,असेही विलासी पुरुषांची मते होती. ईश्वर मिळविण्याचा आटापीटा त्यासाठी श्रद्धा ,विधी यातच आयुष्य जात असे.अनेक बारीक सारीक कामे सतत करूनही तिचे माणूस म्हणून मूल्य नव्हते.बायकांनी यात पडू नये असा पुरुष मंडळी यांचा सल्ला असे. त्यामुळे अशी व्यवस्था ही पवित्र व्यवस्था,यातले जे काही मानसिक सुख ते सुख अशीही काही मते होती. विश्व कसे आहे, जग कसे आहे ,कुठे कोणती माणसे राहतात,याबद्दल काही कळण्याची सोय नव्हती. राजे बदलायचे त्यांच्या मेहेरबानी खाली राहायचे असा दंडकच झाला होता. त्यामुळे या श्रद्धायुक्त आणि मिळालेल्या व्यवहारातच आयुष्य संपून जायचे.याशिवाय रूढीनी देखील नेहमीच स्त्रियांना दुय्यम ठेवले,त्यांच्या इच्छा ,आकांक्षा यांना महत्व दिले नाही. घर आणि जात,आणि समाज सांगेल तो धर्म हेच संस्कार पालन म्हणजे शिक्षण हा शिरस्ता झाला. आज 200 वर्षे उलटून गेली तरी स्त्री सुरक्षा आम्ही करू शकलो नाही. निर्णय स्वातंत्र्य द्यायला मन धजवत नाही,विशेष म्हणजे धन असूनही पराधीन जीवन अशी देखील परिस्थिती आपल्याला कुठे कुठे दिसते.
इंग्रजी राजवटीत जसजसे स्त्रियांना शिक्षण मिळत गेले तसतसे जग कसे आहे कळू लागले.प्रथम अक्षरे आली..वाक्ये आली..वाक्यातून आशय कळू लागला, मिशनरी शाळा नि आरोग्य चांगले ठेवणे,शिक्षण घेणे याकडे लक्ष दिले. इंग्रजी भाषात देशोदेशीचे ज्ञान होते,शाळा ,महाविद्यालये सुरु केल्याने आणि स्र्थानिक भाषेत हे ज्ञान दिल्याने समाज तुलना करू लागला आणि त्यातूनच रूढी परंपरेतील दांभिकता ध्यानी आली. वाचन, भाषण ,लेखन य,श्रवण यात नवे ज्ञान विज्ञान आले. सरकारी शाळा ,समाज सुधारक यांच्या शाळा ,वर्तमान पत्रे, यांनी जनजागृती केली. यातही सुरवातीला पुरुषच शिक्षण घेत होते. पण इंग्रजांच्या मुक्त विचार सरणीचे प्रभावाने अनेक स्त्रिया शिकू लागल्या. आपली दुःखे ,जातीची दुःखे व्यक्त करू लागल्या. आम्हाला साधे माणुसकीचे अधिकार नाहीत,याची जाणीव झाली. त्यातूनच प्रबोधन युग तयार झाले. सावित्रीबाई, जोतीराव, फातिमा ,राजा राममोहन रॉय, राजर्षी शाहू महाराज, लोकहितवादी. महर्षी कर्वे,कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ.आंबेडकर, इंग्रजी राजवटीतले सुधारणावादी मानवता वादी अधिकारी यांनी स्त्रियांना शिक्षण मिळायला पाहिजे यासाठी काम केले. पारंपरिक समाजाला आधुनिक बनवले.
आता आज या काळात स्त्री -पुरुष दोन्ही माणसे असून दोघांची किंमत एकच आहे हे आता घटनेने मान्य केले आहे. सामाजिक व आर्थिक विषमता असलेल्या या देशात अनेक घटकांची कोंडी झाली आहे त्यात स्त्रिया देखील आहेत. पूर्वी संधी नाकारली गेल्याने त्या स्वतः विचारी होत नसत. एक प्रकारची मानसिक गुलामगिरी धर्माने त्यांना दिली पण भारतीय संविधानाने त्यांना समानसंधी दिली.न्याय मिळविणारे पर्यावणासाठी सहाय्य केले. म्हणूनच स्त्रियांना शिक्षण घेण्याचा हक्क कळला.कायद्यातील तरतुदीचे भान आले. गरिबी ईश्वर दूर करत नाही ,आपण स्वतः ज्ञानी होऊन कर्तबगार होऊन ,गरिबी हटवायची आहे ,हा संदेश दिला आहे अलीकडे शेती, उद्योग,विज्ञान, संरक्षण, आणि राजकारण यामध्ये महिलांची संख्या वाढत आहे.तसेच जागतिकीकरण झाल्याने नोकरी व व्यवसाय करण्यासाठी अनेक मुली परदेशात जात आहेत. तरीही समाजात अजूनही तिची सुरक्षितता नाही. बलात्कार घटना वाढल्या आहेत. शिकूनही अनेक स्त्रियांची आणि पुरुषांची या विषयी शासन प्रशासन यांच्याकडे साधे निवेदन देऊन आवाज उठवण्याची तयारी दिसत नाही. शिक्षण घेतले,पण त्याचा उपयोग भोवतालचे भय घालविण्यासाठी ,गरिबी दूर करण्यासाठी ,अनेकाना शिक्षण देण्यासाठी ,अनेकांना प्रोत्साहन देण्यासाठी, वंचित असलेल्या सर्व घटकांना त्यांचे हक्क देवविण्यासाठी करायचा आहे ,त्यासाठी संघटीत होऊन नित्यनेमाने माणूस घडवायचा आहे हे भान सुटले आहे,पदवी,पदव्युत्तर शिक्षण घेऊनही अन्तःकरणात भीती आहे,घर सोडावे वाटत नाही, प्रगती करण्याची महत्वाकांक्षा नाही, केवळ पद प्रतिष्ठा यांच्या लालसा पुरुषांनी दिल्या त्या हवेत पराधीन होत फुगे होऊन आकाशात फिरणे आणि शेवटी फुटणे हे काय आयुष्य आहे ? स्वतः निर्माण केलेली दुःखे इतकी आहेत की समाजाचे काय करायचे साधा विचारही नाही. प्रतिमा हवी आहे ,पण सखोल अभ्यास नको, जग बदलायचे आहे पण घर सोडायला नको, बोलण्यात,आणि संसार रडगाणी गाण्यात सामर्थ्य नाही, पण तिची अडवणूक तर आपणच करतो, परिणामी तिच्यातला पक्षी आकाशात झेप घेत नाही. यासाठी सावित्रीबाई यांची कृतीशील झुंज समजून घेण्याची आवश्यकता आहे. आज विचार करतो त्याला मूर्ख समजण्याचे उपद्व्याप सुरु आहेत , ही व्यवस्था तशीच टिकून राहील हे काम मतलबी माणसे करतात. शासनाने वाटलेले पैसे घेऊन तात्पुरते अडचणी सुटतील पण आर्थिक,मानसिक विकासाठी जाणीवेने हिम्मत देण्याची आवश्यकता आहे. विकासाचा अर्थ सापेक्ष असतो ,व्यक्ती काय चांगले उद्देश ठेवते,आणि प्रयत्न करून इच्छा पूर्ण करते त्यावर तिची प्रगती होते.
सर्वाना मोफत उच्च शिक्षण,विज्ञान,तंत्रज्ञान,व्यवसाय,शेती याचे प्रशिक्षण, जागतिक पातळीवर मागणी असलेल्या कौशल्याचे प्रशिक्षण, दिल्याने रोजगारक्षम महिला तयार होतील. स्वतःच्या मालकीचे व्यवसाय सुरु करणे आणि त्याची भरभराट होईल असे प्रयत्न करणे,काम कुठेही करोत,समान वेतन देणे, व्यवसाय करण्यास आवश्यक भांडवल पुरवणे, मानसिक धैर्य वाढेल असे वातावरण तयार करणे, सुरक्षित असण्याची जबाबदारी घेणे ,महिलांना राजकीय क्षेत्रात संधी देणे,प्रशिक्षण देणे,विश्वासू नागरिक निर्माण करणे,कायदा,संविधान व लोकशाहीचे प्रशिक्षण देऊन जबाबदार नागरिक घडवणे, महिलांचे शिक्षण,नोकरी व व्यवसाय निर्भयपणे करता येईल असे वातावरण तयार करणे ,त्यांना समानतेने वागवणे,त्यांचे स्वातंत्र्याचे अधिकार वापरण्यास त्यांना मुक्तता देणे, हे सर्व करावे लागेल,त्याने विचारी आणि कर्तबगार महिला होतील. संधीच्या समानतेमुळे अनेकविध क्षेत्रात काम करून त्या उत्पादनात वाढ तर करतील पण देशाला आर्थिक दृष्ट्या समृद्ध करतील. संकुचित जीवन जगण्याने झालेला कोंडमारा नष्ट होऊन जीवनात आनंददायी मुक्त प्रवास करता येईल. मुलींचे शिक्षण झाले तर जातीभेद ,अंधश्रद्धा, दांभिकता दूर होऊन समतेसाठी ,बंधुतेसाठी,मानवतेसाठी मोठे काम होईल. सामाजिक विषमता व आर्थिक विषमता दूर करण्यासाठी देशातील सर्व स्त्रियांना नागरिक म्हणून अधिकार उपभोगू देणे व त्यांनीही संधीचा फायदा घेऊन भरीव कामगिरी करून आपला व समाजाचा उत्कर्ष कसा करत आहोत हे दाखवून देण्याची गरज आहे. म्हणूनच महिलांचे या पद्धतीने सक्षमीकरण करत जाण्याने देशाचे भविष्य उज्ज्वल होईल. त्यामुळेच महिला दिन म्हणजे भरीव कामगिरी करण्याचा निर्धार आणि त्यासाठी पद्धतशीर पणे पुढे जाण्यसाठी केलेले नियोजन असे मला वाटते. स्त्री-पुरुष मैत्रभावना निर्माण होणारे आणि एकजुटीने संसार व देश घडविणारे शिक्षण व पर्यावरण आपल्याला हवे आहे.
प्रा. डॉ. सुभाष वाघमारे
(प्रभारी संचालक, भाषा मंडळ, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा )