सार्वजनिक ठिकाणी पूजनासाठी गर्दी कमीच
स्थैर्य, सातारा, दि. 05 : सातारा जन्मोजन्मी हाच पती लाभू दे अशी प्रार्थना वटवृक्षाला करून साता जन्मा साठी नवऱ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या शेकडो सुहासिनी महिलांना यावर्षी वटपौर्णिमेचा आनंद दरवर्षी सारखा लुटता आला नाही. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सध्या असलेल्या लोक डाऊन मध्ये सकाळी नऊ ते पाच ही वेळ सर्व व्यवहारांसाठी शिथिल करण्यात आली असली तरी अनेक महिलांनी वटपूजनाचा सोहळा आपल्या घरीच पाटावर वडाच्या झाडाची रांगोळी काढून तर बाजारपेठेतून मिळणार्या वडाच्या चित्राचे पूजन करून केली .
अनेक महिलांनी विक्रीस उपलब्ध झालेली वडाची फांदी घरी आणून त्याची यथासांग पूजा करुन प्रार्थना केली .दरम्यान सातारा शहरातील मंगळवार पेठ, चिमणपुरा ,पोलीस मुख्यालय परिसर, करंजे गाव भाग, संगम माऊली येथे मात्र महिलांनी सामाजिक अंतर राखत काहींनी तोंडाला मास्क तर काहींनी ओढण्या बांधून या पूजेचा सोहळा संपन्न केला पूजनासाठी मंदिरे बंद असल्यामुळे मंगळवार पेठेतील वटवृक्षाखाली यावर्षी हे पूजन करण्यासाठी कोणताही ब्राह्मण उपलब्ध झालेला नव्हता .महिलांनी सकाळी नऊ वाजल्यापासूनच नटून थटून जरीच्या साड्या दागिने .नाकात नथ घालून हातात पूजेचे तबक घेऊन वडाची यथासांग पूजा केली. सुताने सात फेरे मारत जन्मोजन्मी हाच पती लाभू दे अशी प्रार्थना वडाला केली आणि एकमेकींना हळदी कुंकू लावत सौभाग्याचे वाण म्हणून आंबा व धान्याची ओटी भरून शुभेच्छा दिल्या. यंदा मात्र करोना मुळे या सर्व महिलांच्या पूजेच्या विधीला उत्साह जाणवत नव्हता.