दैनिक स्थैर्य | दि. 13 डिसेंबर 2023 | फलटण | सातारा जिल्ह्यासह राज्याच्या सर्वच भागांमध्ये यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो. प्रत्येक भागाच्या विविधतेनुसार तेथील स्थानिक बचत गटांनी या यात्रा उत्सवामध्ये वस्तूंचे भव्य – दिव्य असे प्रदर्शन आयोजित करावे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांच्या हाताला काम मिळेल. यासोबतच ज्या महिला विविध गृह उत्पादने व त्यांचा ब्रँड तयार करून बचत गटाच्या माध्यमातून विक्री करतात त्यांना मोठे व्यासपीठ तयार होईल; असे मत फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी व्यक्त केले.
फलटण नगपरिषद व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने फलटणचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या रथउत्सवाच्या निमित्ताने मुधोजी हायस्कुल समोरील मैदानात बचत गट उत्पादित वस्तूंचे प्रदर्शनाचे उद्घाटन प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी संजय गायकवाड, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, जिल्हा अग्रणी बँकेचे योगेश पाटील, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चौधरी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे विलास बच्चे यांच्यासह विविध राष्ट्रीकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमास फलटण शहर व ग्रामीण भागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे विजय डोके केले तर आभार शीला घाडगे यांनी मानले.