२० वर्षांच्या जटाबंधनातून ५५ वर्षीय महिलेची मुक्तता; अंधश्रद्धेवर समुपदेशनाचा विजय


स्थैर्य, फलटण, दि. १७ ऑक्टोबर : देवीच्या कोपाच्या भीतीने तब्बल वीस वर्षे जटांचे ओझे वाहणाऱ्या जिंती येथील एका ५५ वर्षीय महिलेची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक शिक्षकांनी यशस्वी समुपदेशन करून जटाबंधनातून मुक्तता केली. योग्य समुपदेशन केल्यास महिलांचा अंधश्रद्धेविरुद्धच्या लढ्यात कृतिशील सहभाग वाढतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन रयत विज्ञान परिषदेचे समन्वयक डॉ. सुधीर कुंभार यांनी यावेळी केले.

जिंती येथील एका वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील या महिलेच्या डोक्यात वीस वर्षांपूर्वी जटा तयार झाल्या होत्या. घरात जटा ठेवणे मान्य नसले तरी, त्या काढल्यास देवीचा कोप होईल या भीतीमुळे आणि त्या शास्त्रीय पद्धतीने काढता येतात या माहितीच्या अभावामुळे त्यांनी हे ओझे वाहणे सुरू ठेवले. अखेर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आणि विज्ञानाचा दृष्टिकोन असलेल्या एका शिक्षिकेने त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला.

श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित, तरडगाव येथील सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या तथा विज्ञान शिक्षिका संगीता काकडे यांनी या महिलेशी संवाद साधून त्यांचे मतपरिवर्तन घडवले. त्यांनी जटा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते डॉ. सुधीर कुंभार यांच्याशी संपर्क साधून महिलेच्या मनातील सर्व शंकांचे निरसन केले आणि अखेर १४ ऑक्टोबर रोजी जटा काढण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला.

या जटामुक्तीच्या कार्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पोतदार, ॲड. हौसेराव धुमाळ, राजेश पुराणिक, फलटण येथील मंदाकिनी गायकवाड, शारदा निंबाळकर, आयाज अत्तार आणि संगीता काकडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. या सर्वांनी अत्यंत शास्त्रीय आणि अलगदपणे २० वर्षे जुन्या जटा सोडवल्या.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, जिंती येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री जितोबा विद्यालयातील विद्यार्थिनींना जटा कशा सोडवाव्यात, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. मुख्याध्यापिका माधुरी जाधव आणि अर्चना सोनवलकर यांच्यासह मीनाक्षी वाघमारे, रिया कदम, अनुष्का रनवरे या विद्यार्थिनींनी पूर्णवेळ सहकार्य केले. प्राचार्या काकडे यांच्या प्रयत्नांमुळे कुटुंबातील आणि परिसरातील अनेक महिलाही या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. जटा सहजपणे सोडवून केस मोकळे करता येतात, हे पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

अनेक तासांच्या परिश्रमानंतर जटांपासून सुटका झाल्यावर त्या महिलेच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर अवर्णनीय आनंद ओसंडून वाहत होता. समाजात आजही अनेक महिला अशा अंधश्रद्धेमुळे जटांचे ओझे वाहत आहेत. अशा कोणत्याही महिलेला जटा काढायच्या असल्यास त्यांनी निर्भयपणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा, त्यांना पूर्णपणे मोफत मदत केली जाईल, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!