दैनिक स्थैर्य । दि. ०२ जुलै २०२२ । सातारा । खंडाळा गावच्या हद्दीमध्ये खंबाटकी घाटातील एका वळणावर एसटीला ओव्हरटेक करताना दुचाकीचा हँण्डल एसटीला लागल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या पत्नीच्या डोक्यावरुन एसटीचे चाक गेल्याने ती जागीच ठार झाली तर दुचाकीचालक पती गंभीर जखमी झाला.
सविता संभाजी चव्हाण (वय 50,सध्या रा.पुणे मूळ रा.सातारारोड ,पाडळी ता.कोरेगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून दुचाकीचालक संभाजी गुलाब चव्हाण (वय 60) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.
याबाबतची घटनास्थळावरुन व खंडाळा पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले संभाजी चव्हाण हे पत्नी सविता चव्हाण यांच्यासमवेत दुचाकी (एमएच-12-ईडी-8360) वरुन सातारारोड, पाडळी याठिकाणी निघाले होते. दरम्यान,दुचाकी खंबाटकी घाटात आली असता एका वळणावर स्वारगेटहून निज्ञालेली एसटी (क्रं. एमएच-13-सीयू-8138) ही सातारा बाजूकडे जात असताना दुचाकीस्वार संभाजी चव्हाण हे डावीकडून अचानकपणे ओव्हरटेक करीत असताना दुचाकीच्या हँण्डलचा एसटीला धक्का लागला. यामुळे दुचाकी घसरुन एसटीच्या चाकाखाली दुचाकीवर पाठीमागे असलेल्या सविता चव्हाण या पडल्या. त्यांच्या डोक्यावरुन एसटीचे चाक जात गंभीर जखमी होत जागीच ठार झाल्या तर दुचाकीचालक संभाजी चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेमधून तत्काळ सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस स्टेशनला झाली असून पोलीस अंमलदार गिरीष भोईटे हे तपास करीत आहे.