म्हसवड पालिकेच्या वतीने भगवानगल्ली परिसर लॉक करताना पालिका कर्मचारी. |
शहरात एकच खळबळ
स्थैर्य, म्हसवड दि.१४ : म्हसवड शहरातील भगवानगल्ली येथे राहणार्या ६० वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास जाणवु लागल्याने तिला सातारा येथील सिव्हील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्याठिकाणी त्या महिलेचा मृत्यु झाला तर संबधित मयत महिलेची कोरोना टेस्ट ही पॉझिटीव्ह आली असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे, दरम्यान शहरातील महिलेचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याची चर्चा सुरु असतानाच आज दि.१४ रोजी आलेल्या अहवालामध्ये एक होमगार्ड व एक पालिका कर्मचारी बाधित झाले असल्याचा अहवाल आल्याने शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढु लागली आहे.
म्हसवड शहरात गत अठवड्यात दोन दिवसांत ५ जण बाधित झाल्याने आरोग्य व पालिका प्रशासनाने त्वरीत हालचाली करीत शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यात यश मिळवले होते मात्र अठवड्याभराच्या विश्रींतीनंतर शहरात पुन्हा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढु लागल्याने शहरवासियांच्या चिंतेत भर पडली आहे. दि.१४ रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात दोन नवीन रुग्णांची वाढ झाली असुन एक होमगार्ड तर दुसरा पालिका स्वच्छता कर्मचारी असल्याचे समोर येत आहे तर दि. १३ रोजी शहरातील भगवानगल्ली येथील ६० वर्षीय महिलेला अचानक त्रास जाणवु लागल्याने तिला येथील खाजगी रुग्णालयात तपासणी करीता नेले असता त्याठिकाणी उपस्थित डॉक्टरांनी संबधीत महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याचे सांगुन त्या महिलेस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवुन दिले आरोग्य केंद्राने संबधित महिलेची अवस्था पाहुन तिला सातारा येथील सिव्हिल रुग्णालयात पाठवुन दिले त्याठिकाणी तिचे स्वाईप घेण्यात येवुन तिच्यावर उपचार सुरु असताना दि. १४ रोजी सकाळी तिचा मृत्यु झाला तर तिचा अहवाल हा बाधित आल्याने पालिका प्रशासनाने भगवानगल्ली परिसर हा कंन्टेटमेंट झोन जाहीर करुन सिल केला आहे.
दरम्यान दि. १४ रोजी पालिका कर्मचारी व होमगार्ड यांनाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असुन या अहवालामुळे शहरात अक्टीव्ह रुग्णांची संख्या ही सध्या ६ झाली आहे. तर शहरातील मयत महिलेची हिस्ट्री तपासण्याचे काम आरोग्य विभागा कडुन सुरु असुन संबधित महिला ही काही दिवसांपासुन आजारी असल्याने ती अकलुज येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जात होती त्या खाजगी रुग्णालयातील ३ डॉक्टरच बाधित झाल्याचे वृत्त असुन तेथेच संबधीत महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शहरात थांबलेले कोरोनाची साखळी पुन्हा सुरु झाल्याची भिती नागरीकांतुन व्यक्त होत आहे.