
दैनिक स्थैर्य | दि. ०३ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक २ फेब्रुवारी रोजी नवल तुकाराम चव्हाण (राहणार कापडगाव, तालुका फलटण) हा युवक कापडगाव येथे ऊस तोडणीचे काम करून बैलगाडीत वाढे भरून त्याची आई जानकीबाई तुकाराम चव्हाण यांच्याबरोबर बैलगाडीतून घरी निघाला होता. शेतातील कच्च्या रस्त्याने जात असताना एका दगडावरून बैलगाडीचे चाक गेल्याने जानकीबाई चव्हाण या वाढ्यावरून घसरून खाली डोक्यावर पडल्या. यात जानकीबाई यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना लागलीच अॅम्बुलन्स बोलावून उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच जानकीबाई चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
याबाबतची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.