सातार्‍यात ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली चिरडून महिलेचा मृत्यू


स्थैर्य, सातारा, दि. 11 डिसेंबर : बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात संगममाहुली येथील सातारा सारिका सुतार (वय 28) या महिलेचा ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली चिरडून जागीच मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी बॉम्बे रेस्टॉरंटहून अजंठा चौकाच्या दिशेने दोन महिला दुचाकीवरून जात होत्या. त्याचवेळी अजंठा चौकातून ऊसाने भरलेली ट्रॉली घेऊन एक ट्रॅक्टर या मार्गावर आला. टीव्हीएस शोरूमसमोर सर्व्हिस रोडवर येण्यासाठी एक क्रेटा कार अचानक पुढे आली. क्रेटा कारला चुकवताना ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर उजवीकडे वळवला.याच क्षणी समोरून येणारी दुचाकी समोरील मोठ्या खड्ड्यात आदळली. धक्का बसल्याने मागे बसलेल्या सारिका सुतार खाली कोसळल्या आणि त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टर-ट्रॉलीचे मागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अजंठा चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट दरम्यान अपघात झालेल्या सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाने उघडीप देऊन आता तीन महिने उलटून गेले असतानाही या सेवा रस्त्यावरील एकही खड्डा न बुजवल्यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. आणखी कोणाचा तरी बळी जाण्यापूर्वी या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी त्या परिसरातील नागरिकांमधून होत आहे.


Back to top button
Don`t copy text!