
दैनिक स्थैर्य । 4 जुलै 2025 । सातारा। माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचे पावणेदोन लाख रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र चोरणार्या महिलेस ऐवजासह चोवीस तासांत दहिवडी पोलिसांनी अटक केली. दीपाली महेश शेंडगे (वय 28, रा. साठेनगर आश्रमशाळेजवळ इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे.
शोभा तुकाराम काटकर (रा. भोदोले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) या 30 जूनला दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. या मंदिराच्या बाहेरील बाजूस असणार्या कासवाजवळ इतर भाविकांच्या सोबत गदींमध्ये दर्शन घेत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे 21.75 ग्रॅम वजनाचे एक लाख 77 हजार 300 रुपये किमतीचेमनी मंगळसूत्र कुणीतरी चोरले असल्याची फिर्याद त्यांनी दाखल केली होती.
सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगणापूर दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मोहन हांगे व नंदकुमार खाडे, पोलिस नाईक नितीन लोखंडे, पोलिस कॉन्स्टेबल महेश सोनवलकर व संतोष वीरकर, पोलिस मित्र निकिता भोसले यांनी गुन्ह्यातील एका अनोळखी महिलेस ताब्यात घेऊन चौकशीकेली. तिने तिचे नाव दीपाली महेश शेंडगे (वय 28, रा. साठेनगर आश्रमशाळेजवळ इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे) असे असल्याचे सांगितले.महिलेची अंगझडती घेतली असता तिच्याकडे सोन्याचे मनी मंगळसूत्र मिळून आले. ते हस्तगत करून चोरीप्रकरणी दीपाली शेंडगे हिला अटक करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मोहन हांगे करीत आहेत.