स्थैर्य, मुंबई, दि. 16 : ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील महत्त्वाचे शिलेदार दिनू रणदिवे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत व्रतस्थ पत्रकार हरपला असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, सन्माननीय दिनू रणदिवे हे महाराष्ट्रातले धडाडीचे, नावाजलेले, कृतीशील पत्रकार होते. ध्येयवादी, युवा पत्रकारांचे आदर्श होते. गोवा मुक्ती लढ्यात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य अत्रे व कॉम्रेड डांगे यांच्यासारख्या मान्यवरांसोबत रणदिवेसाहेबांनी कारावास भोगला होता. संयुक्त महाराष्ट्र समितीने ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिका’ नावाचे अनियतकालिक सुरु केले होते. दिनू रणदिवेंनी पत्रकार म्हणून कारकीर्दीची इथूनच सुरुवात केली. मुंबईतील रेल्वे कर्मचार्यांचा संप, गिरणगावातील कामगारांच्या लढ्याला रणदिवे साहेबांनी आपल्या लेखणीने समर्थ साथ दिली. आयुष्यभर त्यांनी कष्टकरी, वंचित, शोषित समाज घटकांच्या हितासाठी पत्रकारिता केली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.