माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सत्ता गमावल्यापासून वकील व पत्रकार म्हणून नवी कारकिर्द सुरू केली आहे. त्यांच्या लिखाणातून व बोलण्यातून ते नित्यनेमाने आपल्या सत्ताकाळातील गुन्ह्यांचे कबुलीजबाब देत असतात. नुकताच त्यांचा एक लेख इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकात प्रकाशित झाला आहे. त्यात त्यांनी ‘स्वातंत्र्य कायद्यातून मुक्त करा’ असा बहूमोल सल्ला दिलेला आहे. पण ज्या नव्या सरकारला ते असले सल्ले देत असतात, त्यांच्यापुर्वी खुद्द चिदंबरमच दिर्घकाळ सत्तेत होते आणि तसे कायद्याच्या तावडीतुन स्वातंत्र्याला स्वतंत्र करण्याची त्यांना भरपुर संधी मिळालेली होती. तेव्हा त्यांची कुशाग्र बुद्धी चालत नव्हती काय? चालत असती, तर त्यांनी आपल्या पक्षाचा दारूण पराभव होऊन विरोधक भाजपा सत्तेत येण्यापर्यंत प्रतिक्षा कशाला केली असती? कारण आज त्यांना जी स्वातंत्र्याची कायद्याकडून जी गळचेपी चालली आहे, असे साक्षात्कार होतात, ती गळचेपी खुद्द त्यांनीच सुरू केलेली आहे. किंवा त्यांच्याच पक्षाने आपल्याच कारकिर्दीत सुरू केलेली गळचेपी आहे. आपला दावा पुढे रेटण्यासाठी लेखाच्या आरंभीच चिदंबरम यांनी एक क्रम दिलेला आहे. ‘एखाद्या व्यक्तीला अटक झाली म्हणजे त्याने काहीतरी गैरकृत्य केलेले आहे. जर त्याला अटकेनंतर जामिन मिळाला नाही, तर तो दोषी आहेच. जर त्या व्यक्तीला न्यायालयीन कोठडीत पाठवले गेले, तर त्याला शिक्षा व्हायलाच हवी. हे आजकाल गृहीत झालेले आहे. थोडे थांबून वरील निष्कर्ष चुकीचे आहेत असा कोणी विचारही करीत नाही.’ असे चिदंबरम यांना कधीपासून वाटू लागले? त्यांच्याच सुपुत्राला व त्यांना स्वत:ला तशा स्थितीतून जावे लागले, त्यानंतरच का? की त्यापुर्वीपासून त्यांना तसे वाटत होते? की हे अनुभवातून आलेले शहाणपण आहे?
मागल्या दोनतीन वर्षात खुद्द चिदंबरम यांना अटक टाळण्यासाठी गुन्हेगारासारखे फ़रारी व्हायची पाळी आलेली होती. त्यांच्या आधी त्यांचे सुपुत्र कार्ति देखील अशाच अनुभवातून गेलेले आहेत. त्यासाठी त्यांच्यावर असलेले आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत आणि सहाजिकच त्यांना अधिक काळ तुरूंगात डांबून ठेवणे शक्य नसल्याने कोर्टाने जामिन दिलेला आहे. मुलाचीही स्थिती तशीच आहे. पण हा प्रकार भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर सुरू झालेला नाही. तपासयंत्रणा वा पोलिस खात्यासह न्यायालयीन यंत्रणा अकस्मात भाजपा सत्तेत आला म्हणून असे काही वागू लागलेल्या नाहीत. त्याचा खाक्या कॉग्रेस सत्तेत असल्यापासून सुरू झाला आणि चिदंबरम स्वत: देशाचे गृहमंत्री असताना त्याचा कळस झालेला आहे. ज्या कायदेशीर तरतुदीचा अतिरेक करून चिदंबरम यांनी आपल्या गृहमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अटक व जामिनाशिवाय निरपराधांना कोठडीत डांबून ठेवण्याचा मुहूर्त केला, त्याचा हा एकत्रित परिणाम आहे. चिदंबरम आपली कारकिर्दच विसरून गेलेत की काय? कर्नल प्रसाद पुरोहित वा साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर ही नावेही त्यांच्या स्मरणात नाहीत काय? एका बाबतीत कायद्याची कलमे तोकडी पडली तर दुसरी कलमे लावून, किंवा अन्य कुठल्याही खटल्याच्या आरोपपत्रात त्यांची नावे घुसडून त्यांना आठ वर्षापासून तुरूंगातून बाहेर पडू द्यायचे नाही, असा विक्रम कोणी साजरा केला? त्यांच्यावर नुसते आरोप लावून त्यांना जामिन मिळू नये म्हणून कसरती कोणी केल्या? त्याची कागदपत्रे कोणी बनवली वा खाडाखोड केली? की चिदंबरम त्यांची गृहमंत्री म्हणून झालेली कारकिर्दच स्मृतीभ्रंश होऊन विसरून गेलेत? तितकी स्मरणशक्ती शाबुत असती, तर आपण आपल्यालाच आरोपीच्या पिंजर्यात उभे करतोय, याचे तरी स्मरण झाले असते आणि पुढला लेख लिहीलाच गेला नसता ना?
चिदंबरम आज राज्यसभेचे सदस्य आहेत, ती महाराष्ट्राची मेहरबानी आहे. त्यांच्यासोबतच त्यांच्याच पक्षाचे दुसरे राज्यसभा सदस्य कुमार केतकरही आहेत. जे शहाणपण आज इंग्रजीतून चिदंबरम लिहून काढत आहेत व छापून आणत आहेत, तेच शहाणपण केतकरांनी तब्बल दोन तपापुर्वी महाराष्ट्र टाईम्सचा अग्रलेख म्हणून लिहीलेले होते, महाराष्ट्राचे राज्यसभेत प्रतिनिधीत्व करताना आपल्याच एका जुन्या सहकार्याच्या लिखाणाची चोरून कॉपी करू नये, इतके तरी भान असायला नको काय? की इंडियन एक्सप्रेस हे लोकसत्ताचे भावंड असल्याने त्याच्या संपादकांना साहित्य चौर्याचा असलेला आजार चिदंबरम यांनाही जडला आहे? लोकसत्ताचे विद्यमान संपादक इंग्रजी प्रकाशनातून साहित्य चौर्य करतात आणि त्यांच्या इंग्रजी भावंडाचे स्तंभलेखक मराठीतले साहित्य चोरून इंग्रजीत रुपांतरीत करत असतात? केतकर १९९६ सालात महाराष्ट्र टाईम्सचे संपादक होते आणि त्यांनीही असाच एक ‘हितोपदेश” करणारा अग्रलेख लिहीला होता. त्यांच्याच शब्दात तो वाचा. ‘सर्वसाधारणपणे फ़क्त राजकारणी भ्रष्टाचारी असतो आणि इतर व्यवसाय तुलनेत अधिक पवित्र असतात असा अनेकांचा समज असतो. न्यायालये, वकील मंडळी, पत्रकार, लेखक-कवि-नाटककार, कलावंत, विचारवंत, नोकरशहा, उद्योगपती, लष्करी अधिकारी, असे समाजातील अनेक गट राजकीय व्यक्तीला खलनायक ठरवण्याच्या खटपटीत असतात.’… ‘सध्या तरी भारतात न्यायालयीन शुचिर्भूततेचा इतका दरारा तयार झाला आहे की, जामिन नाकारला जाणे याचा अर्थ गुन्हा सिद्ध झाला आहे, असा समज करून दिला जात आहे. त्याचप्रमाणे वृत्तपत्रांनी एखाद्या संस्थेला वा व्यक्तीला लक्ष्य केले की, त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत, असेही मानण्य़ाची प्रथा पडली आहे. “शोध पत्रकारिता” हा या व्यवसायातील शहाजोगपणाचा नमूना ठरू पहात आहे. पत्रकारांनी व्यवस्थेवर अंकुश ठेवावयास हवा, परंतु पत्रकारितेवर तो कोण ठेवणार? अजून तरी प्रेस कौन्सिल, न्यायालये किंवा पत्रकारांच्या संस्था याबाबत कोणतेही मापदंड निर्माण करू शकलेले नाहीत’.
योगायोगाने तेव्हा केतकर संपादक होते आणि चिदंबरम देवेगौडांच्या मंत्रिमंडळातले अर्थमंत्री होते. पण दोघांनी मांडलेला मुद्दा एकच आहे. फ़रक आहे, तो तपशीलाचा. आपला मुद्दा मांडण्यासाठी चिदंबरम अनेक खटले आणि अहवालांचे हवाले देतात. केतकर नुसतेच विवेचन करतात. बाकी मुद्दा एकच. मग असा प्रश्न येतो, की हे शहाणपण सुचण्यासाठी चिदंबरम यांनी आर्थिक घोटाळ्यात आपल्या सुपुत्राला लोटले आणि आपणही त्यात उडी घेतली होती काय? पुरोहित वा साध्वीसारख्या हजारो लोकांना आपण कसे विनाजामिन विनाअपराध तुरूंगात डांबून ठेवले, तोच अनुभव घेण्यासाठी या महाशयांनी अर्थमंत्रीपदाचा कारभार केला होता काय? नुसते त्यांना विनाकारण विनापुरावा जामिन नाकारून तुरुंगात डांबलेले नव्हते; तर त्यातून हिंदू दहशतवाद नावाचे एक थोतांड कायदेशीर भाषेमध्ये प्रस्थापित करण्याचाही प्रचंड आटापिटा केलेला होता. आजही त्या दोघांच्या विरोधातले कुठले पुरावे कोर्टासमोर आलेले नाहीत आणि चिदंबरम यांनाही सहा वर्षात त्यासाठी भरपूर सवड मिळून ही पुरावे देता आलेले नव्हते. पण हे आरोप आहेत, म्हणूनच पुरोहित वा साध्वी हिंदू दहशतवादी असल्याचे दावे, संसदेपासून जाहिर सभेपर्यंत हेच चिदंबरम महोदय करीत राहिलेले होते. तेव्हा त्यांना यातले कुठले मुद्दे आठवत नव्हते की ठाऊकही नव्हते? ही माणसे किती बेशरम व निर्लज्ज असतात, त्याचा हा जीताजागता पुरावा आहे. त्यांना कुठल्या सामान्य कोठडीत ठेवलेले नव्हते, की छळवादही सोसावा लागलेला नाही. पण त्या दोघांनी वा त्यांच्यासारख्या अनेकांनी कॉग्रेसच्या पुरोगामी अजेंडासाठी किती अनन्य अत्याचार सोसले आहेत? त्याची गणती कशात होते, त्याचाही गोषवारा याच लेखातून चिदंबरम यांनी द्यायला हवा होता. पण हाडीमाशी खिळलेली बदमाशी तितके प्रामाणिक होऊ देत नाही ना?