स्थैर्य, फलटण, दि. ५ : राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या आवाहनानुसार कोरोना विरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस फलटण तालुक्यातील खत, शेती औषध व्यापार्यांनी मदत करुन शेतकर्यांच्या नात्यातील जिवंतपणा जपण्याचा प्रयत्न केला आहे, असे फलटण तालुका अॅग्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष लायन रणजितभाऊ निंबाळकर यांनी सांगीतले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी फलटण तालुक्यातील कृषी सेवा केंद्रचालकांनी स्वइच्छेने रुपये 1 लाख 30 हजार रुपयाचे केलेले निधी संकलन व बाहुबली ट्रेडिंग कंपनीचे प्रवीण शहा यांनी 1 लाख 1 हजार एकशे एक, श्रीराम अॅग्रो सर्व्हीस, साखरवाडीचे किरण भोईटे यांनी 5 हजार, दत्तकृपा कृषी भांडार, साखरवाडीचे किरण भोसले यांनी 5 हजार 555, श्रीकांत अॅग्रो क्लिनीक, विडणीचे चंद्रशेखर लाड यांनी 5 हजार ची वैयक्तीक मदत प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. त्यावेळी लायन रणजितभाऊ निंबाळकर बोलत होते. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण जाधव, अनुप शहा, भय्या तावरे, सचिन कुंभार यांच्यासह ग्रामीण भागातील खत व शेती औषध विक्रेते उपस्थित होते.
लायन रणजितभाऊ निंबाळकर पुढे म्हणाले, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी कार्यभार सांभाळल्यापासून उत्तम काम केले आहे. गत डिसेंबर महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यांना त्वरीत शासकीय मदत मिळवून देण्यासाठीही प्रांताधिकारी जगताप यांनी सहकार्य केले होते. सध्याची तालुक्यातील कोरोना प्रतिबंध परिस्थिती हाताळण्यातही प्रांताधिकारी यशस्वी झाले असून तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, आशा वर्कर्स, नगरपालिका कर्मचारी यांच्यात योग्य समन्वय साधून ते सर्वांना मार्गदर्शन करत असल्याचेही रणजितभाऊ निंबाळकर यांनी आवर्जून नमूद केले.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 1000 खाजगी रुग्णालयामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना लागू आहे, त्या रुग्णालयात कोविड 19 चे रुग्णांना मोफत उपचार देणे संदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनास धन्यवाद देण्यात आले. तसेच या बहुमोल मदतीबद्दल फलटण तालुका अॅग्रो डिलर्स असोसिएशनच्या पदाधिकारी व सभासदांना प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी धन्यवाद दिले.