स्थैर्य, फलटण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने यामुळे निर्बंध लागू केले आहेत.याला जबाबदार नागरिकांनी व व्यापार्यांनी सुमारे दोन महिन्यांपासून सर्वतोपरी साथ दिली आहे पण काही बेजबाबदार नागरिकांमुळे राज्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी आता राज्यात लॉकडाऊनचा चौथा टप्पा लागू झाला आहे. पंतप्रधानांच्या जनता कर्फ्यपासूनच सर्वच उपक्रमांनाही नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. परंतु रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्यामुळे राज्यशासनाच्या नियमांत दिवसेंदिवस बदल होत आहेत. रोज नित्यनवे आदेश येत असल्याने प्रशासनाचीही धावपळ होत आहे. याचा परिणाम आता नागरिकांचा व व्यापार्यांचाही संयम सुटत चालला आहे. शासनाने काही अटीशर्तींवर शिथिलता दिली आहे या अंतर्गत काही अटी व शर्तींचे पालन करुन काही व्यवसाय सुरु करण्याची परवानगी आहे पण त्याचे नेमके नियोजन जनतेपर्यंत न गेल्याने व्यवसायीकांस नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. परिणामी खरेदीसाठी वर्दळ व गोंधळाचे वातावरण तयार होत आहे. यात सोशल डिस्टन्सींगचेही तीनतेरा वाजत असून बंदोबस्तावरील पोलिसांचाही ताण वाढत आहे. यापुर्वीच्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवासुविधांचे व्यवसाय निर्धारित वेळेत सुरु होते पण यावेळेतही नागरिक गर्दी करत होते तर अनेक ठिकाणी जत्रेचे स्वरुप याला येत होते. या कालावधीत बहुतांश नागरिकांनी जिवनावश्यक वस्तुंचा पुरेसा साठा आपापल घरी ठेवला आहे. पण लॉकडाऊन मध्ये शिथिलता देताना नियाजनाअभावी करण्यात येत असलेल्या अंमलबजावणीमुळे व्यापारी वर्ग भांबावला असून संभ्रमात आहे तर जनतेचा गोंधळ उडत असताना प्रशासन मात्र नियमांवर बोट ठेवून शासनाच्या आदेशाकडे बोट दाखवत आहेत.
या अशा समन्वयाअभावी मात्र सोयीअभावी गैरसोयच होत आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय काही दुकाने सुमारे दोन महिन्यांतून दिलेल्या सवलतींमुळे उघडली आहेत परंतु तेथे खरेदीसाठी नागरिक मात्र वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे गर्दी करताना दिसून येत असून या माणसांना कोरोनाचा धोका आहे याची जाणिवही आहे पण जगण्यासाठी धडपड मात्र जीवघेणी आहे. त्याचा विचार शासनाने प्राधान्याने करुन टाळेबंदीची शिथिलता ठरविणे गरजेचे आहे.हे निदर्शनास आले की प्रशासन या व्यवसायांवर गदा आणत आहेत. तर काही व्यवसाय मात्र बंदचा आव आणून इतर मार्गाने अगदी चोरीछुपे राजरोस सुरु असून यावर कारवाई होत नसल्याने जो प्रामाणिक व्यापारी आहे त्याचा संयम मात्र सुटत असून प्रशासनातीलच काहींचा या बेकायदेशीर विक्रीला पाठिंबा आहे असा आरोप करत आहेत. धोका धोका म्हणत अतिसावधानताच घातक ठरु शकते याचाही विचार व्हायला पाहिजे. रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत त्यामुळे टाळेबंदीही वाढणार याचा अंदाज जनतेस होताच परंतु चौथ्या लॉकडाऊनमध्ये जनतेस नक्कीच शिथिलता अपेेक्षित होती. परंतु जे निर्णय जाहीर होत आहेत त्यात प्रशासन हतबलता व्यक्त करत आहे तर व्यवसायीकांच्यात संभ्रम वाढत आहे. यामुळे जनतेची गोंधळात गोंधळ अशी अवस्था झाली आहे. दैनंदिन जीवन जगताना सर्वसामान्य जनतेस आता याचे परिणाम माहित असूनही जगण्यासाठी धोका पत्करण्याची मनस्थिती झाली आहे.
प्रचंड अस्वस्थता आणि सक्ती याचा वैताग येऊन त्याचाच उद्रेक अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. रुग्ण वाढत असताना लढवय्यांचा आपला इतिहास असल्याचे सांगत एकाच जागेवर थांबा हे शासनाचे म्हणणे जनतेस आता मान्य नाही. हा वाढता उद्रेक शमविण्यासाठी योग्य नियोजनपुर्वक धोरण अत्यावश्यक आहे. त्याचे नियंत्रण करुन संकटातून संधी आहेच ती साधण्यासाठी परिपूर्ण धोरण राबविणेच आवश्यक आहेे. बाकीच्या राज्यातच नव्हेतर शेजारच्या बारामतीसारख्या रुग्ण आटोक्यात आणून जनजीवन पूर्वपदावर आणलेल्या राज्यकर्ते व प्रशासनाच्या समन्वयातून निर्णय घेण्याची व्यवसायीक व जनतेला अपेक्षित आहे. त्यासाठी वातावरण संरक्षित करुन जनतेला सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासकीय कौशल्याची कसोटी अपेक्षित आहे. परंतु स्थानिक प्रशासन जिल्ह्याकडे जिल्हा प्रशासन शासनाकडे असे एकमेकांकडे बोट दाखवत कागदोपत्री जनतेचा संभ्रम वाढत आहेत. नशीबही आपल्यासमोर हारायला तयार आहे फक्त जिंकण्याची मानसिकता ठेवा असे जनतेला सांगण्यापेक्षा ते दाखवून देण्यासाठी योग्य ती शिथिलता आवश्यक आहे. अनेक राज्यांनी सवलती दिल्यात त्यामुळे आता शासनाने बाऊ…बाऊ…करत बसण्यापेक्षा सुरक्षेची ढाल वापरुन योग्य तो वाव दिल्यास परिस्थिती निश्चितच बदलण्यास मदत होईल.
यासाठी नेतृत्वाने प्रशासकीय कौशल्य दाखवत नोकरशाहीच्या अतिरेकाला चाप बसविणे गरजेचे असून अंधकारमय जीवनात भवितव्य दिसेनाशा झालेल्या जनतेत आशावाद जागृत करणे आवश्यक आहे. याचा विचार आणि ठोस कृती आता करावीच लागेल कारण दोन महिने जनतेने साथ दिली पण आता संयमाचाच कोंडमारा होऊ लागला असून डोक्यापर्यंत पाणी आल्यावर आपल्या पिल्लांनाच पायाखाली घेऊन जीव वाचविणार्या माकडिणीच्या कथेप्रमाणे जनतेच्या संयमाचा उद्रेक होऊ नये याचीच खबरदारी घेऊन तातडिने नियोजन अपेक्षित आहे. तरच संभ्रम आणि गोंधळ संपुष्टात येईल आणि व्यवसायीक व जनतेला दिलासा मिळून जनजीवन पूर्वपदावर येण्यास शासन व प्रशासनास सहकार्य मिळेल.