दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । फलटण । ‘‘फलटण तालुक्यातील जनतेशी आमचे घनिष्ठ नाते आहे. लोकांचे प्रेम आणि प्रतिसाद यामुळे हे नाते आणखीन घट्ट होवून कामाला हुरुप येतो. त्यामुळेच जनसेवेसाठी आम्ही सतत कार्यरत असतो. मात्र वैद्यकीय उपचारांसाठी पुढचे काही दिवस सक्तीची विश्रांती असल्याने आपल्या संपर्कात राहू शकत नसल्याची मनात मोठी खंत आहे. लवकरच आपल्या आशिर्वादावर पुन्हा नव्या जोमाने सेवेत रुजू होईन’’, असा संदेश फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्यातील जनतेला उद्देशून दिला आहे.
पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर छोटेखानी शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे दिनांक 3 मार्च रोजी रवाना झाले असून दिनांक 20 मार्च पर्यंत त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. याबाबतची माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
‘‘महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील गावोगावी आपण संपर्क वाढवला असून ग्रामविकासाच्या योजना राबवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. झपाट्याने होणार्या विकासकामांमुळे जनतेच्या चेहर्यावरचे समाधान पाहून आणखीन जोमाने काम करु वाटते. त्यामुळे दिवसांतील जास्तीत जास्त वेळ आपण कामासाठी देत असतो. मात्र एका छोट्या दंत शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी दिनांक 20 मार्च पर्यंत आपल्याला सक्तीची विश्रांती सांगितली आहे. त्यामुळे आपण जनतेशी वा कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीद्वारे संपर्कात राहू शकणार नाही. आपण जरी फलटण येथे प्रत्यक्ष उपलब्ध नसलो तरी या कालावधीत जनतेची गैरसोय टाळण्याचा संपूर्ण प्रयत्न केला जाणार आहे. तरी तातडीचे काम असल्यास माझ्याशी थेट संपर्क न साधता स्वीय सहाय्यक प्रवीण बोराटे यांच्याशी 9730593069 या क्रमांकावर संपर्क साधावा.’’, असे आवाहनही श्रीमंत विश्वजीतराजे यांनी प्रसिद्धी पत्रकात केले आहे.
‘‘जनतेचे व कार्यकर्त्यांचे अफाट प्रेम आणि आशिर्वाद आपल्या सोबत आहेतच त्यामुळे कुणीही काळजी करु नये. लवकरच आपण कामासाठी पुन्हा सक्रीय होवू’’, असा विश्वासही श्रीमंत विश्वजीतराजे यांनी व्यक्त केला आहे.