
दैनिक स्थैर्य । दि.१४ जानेवारी २०२२ । फलटण । प्रबळ इच्छाशक्ती आणि जोडीला सच्चे साथीदार असतील तर कोणत्याही संकटावर मात करता येते हे फलटण तालुक्यातील निंबळक येथील उदय कुंडलिक ननावरे यांनी सिद्ध करुन दाखवले आहे.
उदय कुंडलिक ननावरे यांना शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन त्या फुफ्फुसात जाऊन श्वसनासाठी त्रात होणे, खोकल्यावर रक्त बाहेर येणे, दम लाखणे, छातीत दुखणे अशा वेदनादायी आजाराने ग्रासले होते. प्रतिकुल परिस्थितीमुळे सदर आजारातून बरे होण्यासाठी आवश्यक असलेली सुमारे 9 ते 10 लाख रुपये खर्च अपेक्षित असणारी शस्त्रक्रिया करणे त्यांना आर्थिकदृष्ट्या अशक्य होते. मात्र उदय ननावरे यांनी हार मानली नाही. इतक्या दूर्धर आजारातही उदय ननावरे खचले नाहीत; उपचारासाठी आर्थिक मदत मिळवण्याकामी ते प्रयत्न करत राहिले. शिवाय त्यांनी आपले माल वाहतूकीसंबंधीचे कामही थांबवले नाही.
अशातच उदय ननावरे यांचे मित्र अमोल बनकर यांच्या माध्यमातून सदरची बाब बारामती येथील मिलींद ढेंबरे यांना समजली. मिलींद ढेंबरे यांनीही तात्काळ शक्यतेवढी मदत तात्काळ उदय ननावरे यांना तर केलीच शिवाय अशा बिकट प्रसंगात वैद्यकीय मदत करणारे दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्याशी दौंड येथील दिनेश लोंढे व शहाजीआण्णा सावंत यांच्या माध्यमातून मोठ्या चिकाटीने त्यांनी संपर्क साधला आणि उदय ननावरे यांच्याविषयी सर्व माहिती आ.कुल यांना दिली. मिलींद ढेंबरे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आमदार राहुल कुल यांच्याकडून उदय ननावरे यांना मोठी मदत मिळाली व त्यांच्यावर आवश्यक ती शस्त्रक्रियाही पार पडली. महेश जाधव या त्यांच्या मित्राने शस्त्रक्रियेच्या काळात रुग्णालयात सोबत राहून उदय ननावरे यांना मोठा आधार दिला.
अडचणीच्या काळात देवदुताप्रमाणे धावून आलेल्या या सर्वांचे उदय ननावरे यांनी आभार मानून आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहीन असे भावनिक उद्गार काढले.