लोकनेते बाळासाहेब देसाई सह. साखर कारखान्यात युवानेते यशराज देसाईंचे हस्ते रोलरचे पुजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दौलतनगर दि. ३० : गतवर्षीच्या गळीत हंगामापेक्षा महाराष्ट्रामध्ये सध्या ऊसाचे प्रमाण जास्त असून साखरेचे भाव यंदाच्या वर्षीही अनिश्चित असून सध्या कोरोना संसर्गाच्या संकटामुळे अनेक कारखान्यांकडे मोठया प्रमाणांत साखेरेचे साठे पडून आहेत. आपला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील असा कारखाना आहे जो अडचणीच्या काळातही महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली साखर उद्योगामध्ये तग धरुन आहे. कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम यापुर्वीच्या सर्वच गळीत हंगामाप्रमाणे चांगल्या प्रकारे पुर्ण केला असून इतर कारखान्यांच्या बरोबरीने आपले देसाई कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची ९० टक्के रक्कम अदा केली आहे. उर्वरीत एफआरपीची रक्कमही लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवून नियोजनबध्द काम करुन सन 2020-21 चा गळीत हंगामही प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करावा, असे आवाहन युवानेते यशराज देसाई यांनी केले.

दौलतनगर, ता. पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात सन 2020-21 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन युवानेते यशराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी रोलरचे पूजन झालेनंतर यशराज देसाई यांनी कारखान्यातील सर्व कामकाजाची पदाधिकारी यांचेसोबत पाहणी केली. योवळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, संचालक आनंदराव चव्हाण, संपतराव सत्रे, बबनराव भिसे, विकास गिरी गोसावी, शशिकांत निकम, सोमनाथ खामकर, वसंत कदम, गजानन जाधव, व्यंकट पाटील, शंकर शेजवळ, दिपाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना यशराज देसाई पुढे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2019-20 चे गळीत हंगामात 02 लाख 02 हजार 414 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 12.10 % सरासरी साखर उताऱ्याने 02 लाख 45 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. मागील सन 2019-20 च्या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील गाळपास आलेल्या ऊसाला प्रतिटन एफआरपीनुसार 2330 प्रमाणे ९० टक्के ऊसबिलाची रक्कम ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांचे बँक खाती आत्तापर्यंत अदा केले आहेत. उर्वरीत राहिलेली एफआरपीची रक्कम लवकरच ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांचे बँक खाती जमा करण्यात येणार आहे. आतापर्यंत मागील गळीत हंगामातील ४७ कोटी १६ लाख रक्कम अदा करण्यात आली असून  केंद्र शासना कडून आपले कारखान्यास 08 कोटी 75 लाख तर राज्य शासनाकडून 02 कोटी 10 लाख असे एकूण १० कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान मिळणेबाकी असून सदरचे अनुदान मिळविणेकरीता गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचे व्यवस्थापन प्रयत्नशिल आहे. केवळ ६ कोटी ६३ लाख रुपयांची रक्कम शेतकरी, ऊस उत्पादकांना देणे बाकी आहे.

यंदाच्या गळीत हंगामात कारखान्यातील गळीत हंगाम पुर्व कामे प्रगतीपथावर असून प्रतिवर्षाप्रमाणे सन 2020-21 च्या ऊस गाळप हंगामाकरीता जादा ऊस गाळपाच्यादृष्टीने कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट व नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. गतवर्षीच्या सरासरी साखर उताऱ्यामध्ये यंदाच्या वर्षी वाढ करण्याचा मनोदय आमचा आहे त्याला यश मिळेल असे सांगून ते म्हणाले, साखर उद्योग अडचणीत असताना देखील आपला देसाई सह. साखर कारखाना चांगल्या प्रकारे सुरु आहे. कारखान्याची क्षमता कमी असूनही तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे आणि गाळप केलेल्या ऊसाला इतर मोठया क्षमतेच्या कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर देण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करीत आलो आहोत. यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाची उपलब्धता चांगली राहणार असून शेतकऱ्यांचा आर्थिक विकासाचा कणा असलेल्या साखर कारखानदारीपुढे आज सातत्याने कोसळणाऱ्या साखर दरामुळे तसेच कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील यावर मात करुन यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करणेकरीता सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. व्यवस्थापनाने ठरविलेल्या नियोजनाप्रमाणे कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियोजनबध्द काम करावे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिकवणाऱ्या सभासद तसेच बिगर सभासद शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला सर्व ऊस आपल्या कारखान्याला देऊन सहकार्य करावे व येणारा गळीत हंगाम यशस्वी करावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी बोलताना केले. यावेळी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!