नम्रता असल्यावर आयुष्यात कोणतेही शिखर गाठणे शक्य : ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२२ । फलटण । आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये कामकाज करीत असताना सर्वांच्यामध्ये विशेतः खेळाडू विद्यार्थी व विद्यार्थिनीच्यामध्ये नम्रता असणे गरजेचे असते. नम्रता आपल्या अंगी असल्यानंतर आयुष्यातील कोणतेही शिखर गाठणे शक्य असल्याचे मत ट्रिपल महाराष्ट्र केसरी व पुणे शहर विभागाचे सहाय्य्क पोलीस आयुक्त पै. विजय चौधरी यांनी व्यक्त केले.

 

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयाच्या क्रीडा व कला विभागाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटोचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र केसरी पै. बापुराव लोखंडे, महाराष्ट्र केसरी पै. गोरख सरक, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कु. प्रियंका येळे, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य प्राश्वनाथ राजवैद्य, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य नितीन गांधी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य शिवाजीराव घोरपडे, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य चंद्रकांत रणवरे, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य शरद रणवरे, संजय भोसले, पै. विकास गुंडगे, माजी नगरसेवक पै. किशोर (गुड्डू) पवार, पै. राहुल सरग, पै. भास्कर ढेकळे, पै. विजयराव गोफणे, मुधोजी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक कांतीलाल खुरंगे, माजी विद्यार्थी अविनाश अब्दागिरे, पै. जयदिप गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

वयाच्या १७ व्या वर्षी मी कुस्ती खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी मला क्रिकेटची फार आवड होती. परंतु वडिलांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहायचे आहे, हे मी ठरवले होते. मला सगळे जण म्हणत असतात की तुम्ही नशीबवान आहे. तर मी नशीबवान नसुन माझ्या आई वडीलांच्या पुण्याईने त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मी चालत आहे. खेळाडूंच्या आयुष्यात मार्गदर्शन खुप महत्वाचे आहे. आई, वडील, गुरू, मित्र कोणाचेही मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. घरी असताना आमच्याकडे काही जनावरे होती. दररोजचे जनावरांचे कामकाज माझ्याकडे असायचे. मी पहिलीपासून पदवीपर्यंत कधीही नापास झालो नाही किंवा विषय सुध्दा कधी मागे राहिला नाही. दिवसभरात फक्त एक तास अभ्यास करायचो त्यामुळेच मी आज इथे आहे, असे हि यावेळी पै. विजय चौधरी यांनी स्पष्ट केले.

२०१२ ला मी उपमहाराष्ट्र केसरी झालो. त्यावेळी मला शारीरिक दुखापत झाली होती. डॉक्टर म्हणाले की आता तुला कुस्ती खेळता येणार नाही. त्यामध्येच मी पुण्यात तालमीत येवुन राहिलो आणि सराव सुरू केला. त्यानंतर हळू हळू कुस्ती खेळत माझा आत्मविश्वास वाढत गेला. ज्या डॉक्टरांनी सांगितले होत की मला कुस्ती खेळता येणार नाही त्यांनाच मी महाराष्ट्र केसरीची गदा व बेल्ट दाखवला. त्यावेळी त्यांनी माझ्या बातमीचे कात्रण दवाखान्यात लावले होते. आयुष्यात संघर्ष हा असतोच त्यातुनच बाहेर पडणे हे गरजेचे असते त्यासोबतच मार्गदर्शन घेणे हे सुद्धा महत्वाचे असते. क्रीडा क्षेत्रात काम करणारे सर्वजण हे अद्वितीय असतात. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मित्रांची चांगली संगत असणे गरजेचे आहे. मित्रांची चुकीची संगतच आपल्याला अडचणीत आणू शकते. खळाडूंसह युवकांनी व्यसनापासून दूर राहणे सुध्दा गरजेचे आहे. आजच्या पिढीमध्ये अतिशय हुशार मुले व मुली आहेत. त्यांनी काही गोष्टी मनाशी ठरवून आपले कामकाज करणे गरजेचे आहे. आपल्या गावासोबतच आपल्या आई, वडील व गुरूंचे नाव मोठे करणे गरजेचे आहे, असेही यावेळी पै. विजय चौधरी यांनी स्पष्ट केले.

यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटोचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले कि, कोरोनाच्या प्राश्वभुमीमुळे गेली दोन वर्षे पारितोषिक वितरण समारंभ घेता आली नाही. प्रमुख पाहुण्यांपासुन आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणूनच आपण ट्रिपल महाराष्ट्र केसरी व सहाय्यक पोलीस आयुक्त पै. विजय चौधरी यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवले. पैलवान मंडळी फक्त मैदानात आक्रमक असतात तर खर्या आयुष्यात अतिशय विनम्र असतात. कोणीही पैलवान होणे शक्य नाही. पैलवानांनी किती व्यायाम केला हे ऐकले तरी आपल्याला घाम येईल. महाराष्ट्र केसरीसाठी खुप मोठी स्पर्धा असते. त्यात तिन वेळा महाराष्ट्र केसरी होणे हे कोणालाही शक्य नाही. सातारा जिल्ह्याला व फलटण तालुक्याला कुस्तीची मोठी परंपरा आहे. खाशाबा जाधव यांनी सातारा जिल्ह्याला ऑलंपिक पदक पटकावून दिले आहे. कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्राचा दबदबा निर्माण करण्याचा मानस आजच्या कुस्ती पटूंनी ठेवणे गरजेचे आहे.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय प्रभारी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांनी करून दिला. मुधोजी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाची सविस्तर माहिती प्रा. डॉ. स्वप्निल पाटील यांनी दिली. मुधोजी महाविद्यालयाच्या कलाविष्कार विभागाची सविस्तर माहिती कला विभाग प्रमुख प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!