
दैनिक स्थैर्य । दि. २७ डिसेंबर २०२१ । सातारा । जकीनपेठ, ता. भुदरगड येथील म्हातारीच्या पठारावर बंद स्थितीत असलेल्या पवनचक्कीचे ६८ लाखांचे साहित्य चोरून नेत असताना नऊ जणांना पकडले. त्यांच्याकडील वाहने, मोबाइल असा सुमारे तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भुदरगड पोलिस व घटना स्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी, जकीनपेठ येथील पठारावर मारुती विंड कंपनीने पवनचक्की उभारल्या आहेत. पण या बंद स्थितीत असल्याने या ठिकाणचे साहित्य चोरून नेण्यासाठी गुरुवारी रात्री उत्तम सोपान कारंडे (रा.कोळा ता. सांगोला जि. सोलापूर), मच्छिंद्र महादेव हेपलकर (रा. जत, जि. सांगली), संतोष तानाजी ढेरे (रा. ढेरेवाडी ता. राधानगरी), प्रफुल्ल हरिश्चंद शर्मा (रा. गापालगंज, राज्य बिहार, सध्या रा.बिद्री ता. कागल), निहाज मुल्लाजीम अन्सारी (रा. गोरखपुर कुशिनगर उत्तर प्रदेश सध्या रा.चंद्रे,ता. राधानगरी), अक्षय प्रकाश चौगुले (रा. खेबवडे ता. करवीर), प्रशांत हनुमंत जाधव (रा. तारळे ता.पाटण जि. सातारा), तानाजी एकनाथ पवार (रा.मंगळवार पेठ सातारा), संतोष दत्तात्रय जाधव (रा. तारळे, ता. पाटण, जि. सातारा) याठिकाणी आले. त्यांनी पवनचक्कीचे मौल्यवान मिश्रधातूचे अवजड पार्ट गॅस कटरने कापून ते हायड्रा क्रेनच्या सहाय्याने उचलून ते कंटेनर ट्रकमध्ये भरून चोरून नेत असताना पोलिसांना खबर लागली. पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडून त्यांनी चोरलेले पवनचक्कीचे मौल्यवान मिश्रधातूचे कापून काढलेले सुट्टे पार्ट ३४ टन वजन त्याची किंमत सुमारे ६८ लाख रुपये, २ कंटेनर ट्रक, २ हायड्रा क्रेन, एक इनोवा कार, एक मोटर सायकल, ५ छोटे मोठे गॅस सिलेंडर, गॅस फ्लेम कटर व पाईप, वेगवेगळ्या कंपनीचे एकूण ८ मोबाईल असा एकूण १ कोटी ३४ लाख पाच हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह पकडले.
आरोपी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच बिहार येथील असून आणखी साथीदार असण्याची शक्यता आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.