स्थैर्य, सातारा, दि. 7 : ठोसेघर, चाळकेवाडी परिसरामध्ये पवनचक्की टॉवरच्या तांब्याच्या तारा चोरणार्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून त्यांच्याकडून दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सातार्यातील बुधवार नाका परिसरातील ही कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती अशी, ठोसेघर, चाळकेवाडी परिसरामध्ये पवनचक्की टॉवरच्या तांब्याच्या तारांची चोरी होत असल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत होते. दि.6 एलसीबीचे पोनि सर्जेराव पाटील यांना बुधवार नाका परिसरात संशयीत येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर बुधवार नाका परिसरामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जहाड व पथकाने सापळा लावून दोन मोटार सायकलवरील चार संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता 8 दिवसांत संशयीतांनी चिखली, ता. जि. सातारा याठिकाणी पवनचक्कीच्या टॉवरच्या व सुमारे 6 दिवसापुर्वी डफळवाडी ता.पाटण जि.सातारा येथील पवनचक्कीच्या टॉवरच्या तांब्याच्या तारांच्या चोरी केली असल्याचे सागितले. त्यांना पुढील तपासकामी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले असून नमूद इसमांचेकडून एकूण 1 लाख 51 हजार रुपये किमतीच्या पवनचक्कीच्या विद्युत तांब्याच्या तारा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. संशयीतांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत अधिनियम कलमानुसार आणि उंब्रज पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत अधिनियमानुसार गुन्हे उघड झाले असून त्यामधील संपुर्ण चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यास पथकास यश आलेले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनेनुसार पोनि सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जहाड, स. फौ. उत्तम दबडे, हवालदार तानाजी माने, राम गुरव, संतोष पवार, विजय कांबळे, पो. ना. रवि वाघमारे, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, पो. ना. संजय जाधव यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.