दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘‘खासदारकीच्या काळात कोरोनामुळे मिळालेल्या जेमतेम दोन – अडीच वर्षांच्या कार्यकाळात आपण फलटणला रेल्वे आणली, पालखी महामार्ग, बारामती रस्ता, फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते पूर्ण केले, वर्षोन्वर्षे रखडलेली निरा – देवघरची प्रलंबित कामे पूर्ण होण्यासाठी निधी आणला, आर.टी.ओ. ऑफीस आणलं, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आणलं. लोकसभेच्या निवडणूकीत तुम्ही सर्वांनी मताधिक्य दिलं पण दुर्दैवाने आपला पराभव झाला. आता आपल्याकडं खासदारकी नाहीये पण तुम्ही जर सचिन पाटलांना आमदार केलं तर आपली विकासकामे आपल्याला आणखीन वेगाने पूर्ण करता येतील’’, असे आवाहन माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मतदार भेटीदरम्यान करीत आहेत.
फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ रणजितसिंह नाईक निंबाळकर फलटण शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोपरा सभांद्वारे मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या या दौर्यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
‘‘आपण उभा केलेला उमेदवार शेतकरी कुटूंबातला आहे. त्याला शेतकर्यांच्या प्रश्नांची जाण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून ते निवडणूक लढवत असल्याने त्यांना तुम्ही निवडून दिल्यावर अजित पवारांचेही लक्ष आपल्या फलटणकडे राहणार आहे. शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत. त्यांचे कार्य मोठे आहे. पण इतकी वर्षे सत्तेत असूनसुद्धा त्यांनी आपल्या फलटणसाठी काहीही केले नाही हे आपले दुर्दैव आहे. अजित पवारांनी आपल्याला रेल्वेच्या कामात मदत केली. मी स्वत: भारतीय जनता पार्टीत असल्याने आणि राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याने भाजप आणि अजित पवार यांच्या दुहेरी ताकदीने आपल्याला तालुक्याचा भरघोस विकास करुन घेण्याची नामी संधी आहे. आम्हाला वैयक्तीक काहीही नको; फक्त आमच्या फलटणचा बारामतीसारखा विकास करा असं आम्ही अजित पवारांना सांगितलं आहे. त्यामुळे इतकी वर्षे विकासात मागे राहिलेला आपला फलटण तालुका पुढे नेण्यासाठी सचिन पाटील यांना विजयी करा’’, असे आवाहनही रणजितसिंह नाईक निंबाळकर मतदारांना करीत आहेत.
‘‘विद्यमान आमदार गेल्या 15 वर्षात तुमच्याकडे कितीवेळा आले?, त्यांनी तुमच्या गावासाठी काय काम केले?, दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांसाठी त्यांनी काय योगदान दिले?, रोजगाराच्या कोणत्या संधी त्यांनी उपलब्ध केल्या? या प्रश्नांचा तुम्ही फक्त बारकाईने विचार करा. तुम्हाला एकही काम दिसणार नाही. त्यामुळेच यंदा आमदार बदलून बघा. सचिन पाटील यांनी 5 वर्षात काम केले नाही तर आपण तुमच्याकडे पुन्हा कधीच मते मागायला येणार नाही’’, असेही रणजितसिंह नाईक निंबाळकर मतदारांशी संवाद साधताना आवर्जून सांगत आहेत.