दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२१ । फलटण । प्रसन्न रुद्रभटे । फलटणचे अधिपती व विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव व फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये पूर्ण ताकदीने सक्रिय होणार असल्याची चर्चा सध्या फलटण शहरासह तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. आगामी होणाऱ्या फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरून निवडणूक लढवणार असल्याचे ही बोलले जात आहे. श्रीमंत अनिकेतराजेंच्या फलटण एंट्रीने फलटणच्या राजे गटामधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमाणेच श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे उच्च विद्या विभूषित आहेत. आपले पिताश्री ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमाणेच फलटण नगरपरिषदेपासून आपल्या राजकारणाचा श्री गणेशा श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे करणार असल्याचेही समोर येत आहे. आगामी होणाऱ्या फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरून फलटण नगरपरिषदेवर निवडून येऊन फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुद्धा श्रीमंत अनिकेतराजे होवू शकतात. सध्या सोशल मीडियावर श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे नगरपरिषदेच्या माध्यमातून राजकारणामध्ये कम बॅक करणार असल्याच्या विविध पोस्ट सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
सध्या फलटणच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटामध्ये युवकांचे नेतृत्व करण्यासाठी पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर हे कार्यरत आहेत. तरी फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे यांनी ज्या प्रमाणे कामकाज केले त्याच प्रमाणे फलटणच्या राजकारणासह समाजकारण करण्यासाठी युवा पिढी म्हणजेच युवराज श्रीमंत अनिकेतराजे, श्रीमंत सत्यजितराजे व श्रीमंत विश्वजितराजे हे आगामी काळामध्ये तालुक्यामध्ये काम करताना दिसणार आहेत.
श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे पेशाने वकील असून राजकारणाचा बाळ कडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालेला आहे. ना. श्रीमंत रामराजे हे राज्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कायमच सक्रिय असतात. सातारा जिल्ह्यातील कोणत्याही घडामोडींना ना. श्रीमंत रामराजेंचा हात लागल्याशिवाय पूर्ण होताना दिसुन येत नाहीत. त्या प्रमाणेच फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे कार्यरत आहेत. राज्यासह देशाला आदर्शवत ठरावी अशी बाजार समिती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी अथक परिश्रम घेत तयार केलेली आहे. बाजार समितीचा फलटण पॅटर्न हा संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरलेला आहे. या प्रमाणेच सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे नेहमीच कार्यरत राहिलेले आहेत. सातारा जिल्हा परिषदेला स्वच्छेतेमध्ये देशपातळीवर गौरव होण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अध्यक्ष असताना विशेष परिश्रम घेतलेले होते. फलटण तालुक्यातील कोणत्याही नागरिकांची कसलीही अडचण असूद्यात ते जर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे गेले तर त्यांची अडचण तातडीने दूर करण्यासाठी श्रीमंत संजीवराजे हे कार्यरत असतात. या सोबतच गत पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्याच्या राजकारणामध्ये येऊन फलटण तालुक्यातील युवकांचे एक फळी उभी करण्याचे त्यांनी कामकाज केलेले आहे.
श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या राजकारणामध्ये सक्रिय होणे हे राजे गटासाठी अत्यंत महत्वाचे आहे. राजे गटामध्ये युवकांशी संवाद साधण्यासाठी युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी राजकारणामध्ये पूर्ण ताकदीनिशी येणे गरजेचे आहे. फलटणचे राजे कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग फलटण तालुक्यामध्ये आहे. फलटण तालुक्यामध्ये जर विरोधकांना रोखायचे असेल तर श्रीमंत अनिकेतराजेंनी फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये येवून फलटणला पूर्ण वेळ देणे गरजेचे आहे.
फलटणला तुमची गरज आहे; युवराज लवकर या मैदानात : श्रीमंत विश्वजितराजे
फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे माझे बंधू असून ते एक हुशार, सुसंस्कृत व निस्वार्थि असे व्यक्तिमत्व आहे. आज आम्हाला तुमची गरज आहे. फलटण तालुका त्यांच्या युवराजांना हाक मारतोय. तुमचा भाऊ तुम्हाला हाक मारतोय. आता या लवकर आणि उतरा मैदानात. आम्ही तुमची वाट पाहतोय. एंट्री होणारच आणि आवाज सुद्धा होणार, असे मत पंचायत समितीचे सदस्य व युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी WhatsApp स्टेटस द्वारे नुकतेच व्यक्त केलेले होते.