
दैनिक स्थैर्य । दि. १५ फेब्रुवारी २०२२ । फलटण । प्रसन्न रूद्रभटे । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते, फलटण संस्थानचे अधिपती व विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव व फलटण संस्थानचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे फलटणच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरु असतानाच ना.श्रीमंत रामराजे यांनी गत दोन दिवसांपूर्वी आपल्या व्हॉटस्अॅप स्टेटसवर श्रीमंत अनिकेतराजे यांचा फोटो पोस्ट करुन त्याला माय सन असे कॅप्शन दिले होते. हा श्रीमंत अनिकेतराजेंच्या राजकारणातील सक्रियतेचाच संकेत असल्याचा तर्क काढला जात आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राज्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणात पुर्ण पणे सक्रीय असतात. राज्याच्या व जिल्ह्याचे राजकारण करत असताना श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे फलटण शहराच्या व तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाले तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा मोठा ताण कमी होणार आहे. शिवाय तालुक्यात विविध विकास योजना राबवण्यामध्ये ना.श्रीमंत रामराजे यांना श्रीमंत अनिकेतराजेंच्या रुपाने आणखीनच हातभार लागू शकतो. ना.श्रीमंत रामराजे यांचा अनुभव आणि श्रीमंत अनिकेतराजे यांची आधुनिक दृष्टी यामुळे तालुक्याच्या विकासात भरघोस वाढ होईल, अशीही सकारात्मक चर्चा या निमित्ताने होत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे रोल मॉडेल तयार करून राज्यात नव्हे तर देशांमध्ये अशी कृषी उत्पन्न बाजार समिती बघायला मिळणार नाही अशी कृषी उत्पन्न बाजार समिती साकारलेली आहे. शेतकर्यांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सध्याला बघितले जात आहे. राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करत असताना श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे विकासासाठी कायमच आग्रही असतात. तालुक्यामध्ये विविध विकासाच्या योजना कशा प्रकारे आणल्या जातील याबाबत सुद्धा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे सक्रीय असतात
यासोबतच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे फलटण तालुक्यामध्ये घरोघरी संबंध आहेत. तालुक्याच्या राजकारणामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा जनसंपर्क अफाट आहे. फलटण तालुक्यात घरोघरी श्रीमंत संजीवराजे यांची एक विशेष ओळख आहे. तालुक्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना श्रीमंत संजीवराजेंच्या जोडीला युवराज श्रीमंत अनिकेतराजे हे राजकारणामध्ये सक्रिय झाल्यास तालुक्याच्या राजकारणामध्ये गेली तीन दशके भक्कम असलेल्या राजे गटाला नक्कीच आणखीन फायदा होईल.
पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी गत पंचवार्षिकला पंचायत समितीची निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यानंतर पंचायत समितीचा बारीक अभ्यास करून सुरुवातीचे काही वर्ष कोणतेही पद न स्वीकारता तालुक्यांमध्ये युवकांचे वेगळे जाळे निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. नंतर पंचायत समितीच्या सभापती पदाची जबाबदारी स्वीकारून फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सध्या श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर हे कार्यरत आहेत.
आगामी काळामध्ये फलटणच्या राजकारणामध्ये युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर जर सक्रिय झाले तर त्याचा फायदा नक्कीच राजे गटाला होईल. श्रीमंत अनिकेतराजे हे विधिज्ञ असून त्यांचा विविध विषयांमध्ये गाढा अभ्यास आहे. त्याचा फायदा नक्कीच फलटण शहरासह तालुक्याला होईल. त्यामुळे ना.श्रीमंत रामराजे यांचा व्हॉटस्अॅप स्टेटस श्रीमंत अनिकेतराजेंच्या राजकीय सक्रीयतेचा तर संकेत नसेल ना? यावर तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.