दैनिक स्थैर्य | दि. 27 डिसेंबर 2023 | फलटण | निंबळक ग्रामस्थांसाठी आवश्यक नागरी सुविधा, ग्रामसचिवालय, निमजाई मंदिर जिर्णोद्धार गेल्या १५/२० वर्षात पूर्णत्वास गेल्यानंतर आता प्रत्येक वर्षी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर आयोजित करुन निंबळक व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना दर्जेदार वैद्यकिय सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबर हवा, पाणी प्रदूषण नियंत्रणासाठी काम करण्याचा मनोदय उद्योजक राम निंबाळकर यांनी व्यक्त केला.
राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्वेसर्वा, उद्योजक आणि शेतकरी राम निंबाळकर यांच्या एकसष्टी निमित्त निंबळक ग्रामस्थांनी त्यांच्या सन्मान सोहोळयाचे आयोजन मोठ्या थाटाने आणि दिमाखात केले होते. त्यामध्ये कृतज्ञता व्यक्त करताना राम निंबाळकर यांनी वरीलप्रमाणे घोषणा केली. त्यावेळी माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ. दिपकराव चव्हाण, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक भालचंद्र जगताप, प्रतापराव देसाई (आंधळकर), के. बी. फंड, मोहनराव पाटील (कराड), निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, ज्येष्ठ नेते महादेवराव पवार, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मोहनराव नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, वाहन निरीक्षक संभाजीराव गावडे, विक्रमसिंह भोसले, प्रा. रमेश आढाव, सरपंच सौ. सीमा बनकर, उपसरपंच विकास भोसले आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह निंबळक व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि निंबाळकर कुटुंबीय उपस्थित होते.
पुणे शहरासह अन्य शहरात वाढते हवा, पाणी व अन्नाचे प्रदूषण आगामी काळात ग्रामीण भागात पोहोचणार असल्याचा धोका लक्षात घेऊन, आपण त्यापासून दूर राहण्यासाठी आतापासून माझे आरोग्य – माझी जबाबदारी या उक्ती प्रमाणे योग्य निर्णय घेतले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करीत विषयुक्त अन्न धान्याचे व फळे भाजीपाल्याचे उत्पादन मानवी आरोग्याला हानीकारक असल्याने नवनवीन आजार वाढत असताना प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्यांना त्यावरील वैद्यकिय उपचार परवडणारे राहिले नाहीत, त्यासाठी प्रदूषण नियंत्रण, सेंद्रीय शेती उत्पादनांना आणि सवलतीच्या दरातील वैद्यकिय उपचारांना प्राधान्य देवून गोरगरिबांना त्या सुविधा विशेषतः ग्रामीण भागात प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता राम निंबाळकर यांनी व्यक्त केली. यासाठी प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्रा. आरोग्य केंद्र सुदृढ आणि सक्षम असली पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यासाठी आ. दिपकराव चव्हाण यांनी लक्ष घालून ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम आणि सुदृढ होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा राम निंबाळकर यांनी व्यक्त केली. आगामी काळात त्यासाठी काम करणार आणि सक्रिय राजकारणात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निंबळक व परिसरातील ग्रामस्थांसाठी आपण केलेले काम हे आपली जबाबदारी म्हणून केले आहे, गेली २०/२५ वर्षे ग्रामपंचायत माध्यमातून झालेले काम सर्वांच्या साथीने केले असल्याचे नमूद करीत आगामी काळात त्यामध्ये खंड पडणार नाही याची ग्वाही देत ग्रामस्थांनी एकसष्टी निमित्त केलेला सत्कार आणि त्याचे उत्तम नियोजनाबद्दल राम निंबाळकर यांनी सत्कार समिती व ग्रामस्थांना धन्यवाद दिले, विविध मान्यवरांसह अनेकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहुन दिलेल्या शुभेच्छांबद्दल राम निंबाळकर यांनी त्यांचेही आभार मानले.
प्रारंभी संजय कापसे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात उद्योजक राम निंबाळकर एकसष्टी सत्कार सोहोळयासंबंधी विवेचन केले. विजयसिंह मोहिते पाटील यांनी एकसष्टी निमित्त शुभेच्छा देताना राम निंबाळकर यांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि सुख समाधान लाभावे यासाठी निमजाई चरणी प्रार्थना केली. त्यानंतर मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्योजक राम निंबाळकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
आ. दिपक चव्हाण यांनी राम निंबाळकर यांच्या उद्योग, कृषी, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेत त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे अशी परमेश्वर चरणी प्रार्थना केली.
श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर व सुभाषराव शिंदे यांनी आता व्यवसाय उद्योग क्षेत्राची जबाबदारी सुपुत्र अधिराज यांच्यावर सोपवून पूर्णवेळ समाजकारण व राजकारण यासाठी देण्याची मागणी करीत आता केवळ निंबळक नव्हे संपूर्ण तालुक्यासाठी विकास कामे व त्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती करीत हा जिल्हा परिषद गट विकास कामात आघाडीवर नेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन राम निंबाळकर यांना केले.
विश्वासराव भोसले यांनी आपण वर्गमित्र असल्याचे सांगत जुन्या आठवणींना उजाळा देत शुभेच्छा दिल्या.
राम निंबाळकर यांच्या उद्योग व्यवसायातील आणि सामाजिक, औद्योगिक, कृषी क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा सविस्तर आढावा घेत व्यवसायातील प्रामाणिकपणा, अचूकता, वेळेवर आणि बिनचूक काम करण्याची पद्धत याविषयी विस्ताराने माहिती देत, महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केलेला सत्कार, त्यांनी मिळविलेला नावलौकिक आणि त्यातून झालेल्या सन्मान याविषयी माहिती दिली तर ग्रामपंचायत माध्यमातून ग्रामस्थांना दिलेल्या नागरी सुविधा, ग्रामदैवत निमजाई मंदिराच्या जीर्णोद्धार कामातील त्यांचा पुढाकार याचा सविस्तर आढावा ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी घेतला आणि राम निंबाळकर यांचे अभिष्टचिंतन केले.
राम निंबाळकर व अन्य मान्यवरांना मिरवणुकीने सभा स्थानी घेऊन येताना पुष्पवृष्टी करण्यात आली.
जाधव यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले, प्रमोद रणवरे यांनी सूत्र संचालन केले.