दैनिक स्थैर्य । दि. १० फेब्रुवारी २०२१ । मुंबई । शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत भाजपवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. ‘ईडी’ कारवाईवरून केलेल्या आरोपांवर संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली. याला राऊत यांनी यावेळी उत्तर दिलं. आपल्याला जनतेसमोर सत्य मांडण्याचा अधिकार आहे, असं ते म्हणाले. ‘ईडी’च्या आरोपांप्रकरणी आपण कोर्टात बोलणारच आहे, असं उत्तर राऊत यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिला.
महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्याच्या भाजप नेत्यांच्या वक्तव्याचाही राऊत यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. सरकार पाडण्याच्या कितीही धमक्या दिल्या तरी शिवसेना आणि महाराष्ट्र अशा येड्या गबाळ्यांपुढे झुकणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. येत्या १० मार्चनंतर महाराष्ट्रातील सरकार पडणार असल्याचं भाकीत वर्तवणाऱ्यांना आपल्या शुभेच्छा आहेत, असा टोलाही राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार नेते महाराष्ट्राचा कणा आहेत. कोणी कितीही दबाव आणला तरी शिवसेना कोणापुढेही झुकणार नाही, असं राऊत म्हणाले. महाराष्ट्र करोनाचा सुपर स्प्रेडर आहे, असं पंतप्रधान मोदी संसदेत म्हणाले. महाराष्ट्रामुळे करोना पसरला, हे धादांत खोटं आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते यावर गप्प का? असा सवाल राऊत यांनी केला.
ने मजसी ने परत मातृभूमीला… गीत पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी बनवलं. म्हणून त्यांना आकाशवाणीतून काढलं, या तथ्य वाटत नाही. पण पंतप्रधान मोदी हे महान आहे. हे महान पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी कोणी असे पंतप्रधान झाले नाही आणि होणार नाही, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली.
आम्ही महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांमध्ये निवडणुका लढवत आहोत. आता उत्तर प्रदेश गोवामध्ये निवडणुकीत उतरलो आहोत. हे भाजपला खटकत आहे. यामुळे भयापोटी ‘ईडी’चे राक्षस आमच्या मागे लावले जात आहेत. पण तुम्ही आमच्याविरोधात अजून दडपशाही करा. हे चांगलचं आहे. तुमच्या या कारवाई याविरोधात महाराष्ट्रातून अजून जोरदार प्रतिक्रिया उमटेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.